कोंकण

येथील विजेचा प्रश्न सुटला, माणूसपणाचा अजूनही कायम आहे !

येथील विजेचा प्रश्न सुटला, माणूसपणाचा अजूनही कायम आहे !

विवेक ताम्हणकर, कोंकण

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असे एक शहर आहे जे राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी नेहमीच चर्चेत असते. हे शहर रात्रीच्या अंधारातही विजेच्या असंख्य दिव्यांनी उजळून जाते.

रस्ते, पायवाटा, पानंदितही रात्रभर जाळणारे दिवे इथे आहेत. याचा शहराच्या पोटात एक आदिवासी कातकरी बांधवांची वस्ती आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर येथील झोपडीत विजेचे दिवे पेटले आहेत.

आमच्याही झोपडीत वीज यावी. दिवा पेटावा. वीजेच्या प्रकाशात अख्खी झोपडी उजळून निघावी. वीजेच्या लख्ख प्रकाशात शाळेत जाणारी पोरं पुस्तकं उघडून वाचत बसावीत.

त्यांना अभ्यास करताना डोळे भरुन पाहत राहावं. उजेडातच उद्याची स्वप्ने बघावीत. दिवसभर मरेस्तोवर कष्ट केल्यानंतर रात्री वीजेच्या प्रकाशात जेवणाचे ताट स्वच्छपणे बघतच भूक भागवावी.

ही आशा आणि स्वप्ने होती एका छोट्या समाजाची. आपल्याच बांधवांची. कणकवली शहरातील कातकरी आदिवासी बांधवांची.

गेली कित्येक दशके इथे झोपडी बांधून राहत असलेल्या कातकरी आदिवासी बांधव बाकी शहराच्या झगमगाटात आपल्याही झोपडीतला काळोख नष्ट व्हावा नि वीजेच्या प्रकाशात झोपडी उजळून निघावी या आशेवर तो जगत आलाय.

पण सूर्य बुडाला की रात्रीच्या अंधारात गुडूप होणाऱ्या कातकऱ्यांच्या जगण्याची कोणालाच फिकीर नव्हती. ना सरकारला आस्था, ना प्रशासनाकडे त्यांच्यासाठी संवेदना. कैक वर्षे ही कुटुंबे काळोख पीतच जगत आली. अखेर हा वनवास आता संपला. दीर्घ संघर्षानंतर रात्रीचा प्रकाश या झोपड्यांमध्ये दिसू लागला.

इतक्या वर्षानंतर कातकरऱ्यांच्या झोपडीत वीज आली त्यासाठीही कातकऱ्यांना दीर्घ संघर्ष करावा लागला आहे. खरं तर कणकवली तालुक्यात फोंडाघाट गांगोवाडी, करंजे आणि कणकवली गणपती साना याठिकाणी कातकरी बांधव राहत आहेत.

पण वस्तीत पाणी नाही, वीज नाही, पक्की घरे नाहीत, रस्ता नाही, झोपड्यांची अवस्थाही फारसी चांगली नाही. अशा अवस्थेत त्यांना जगायला भाग पाडले गेले.

मात्र गेल्या दीड वर्षापासून श्रमिक मुक्ती दल, सत्यशोधक जन आंदोलन आणि कातकरी पुनर्वसन संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली कातकरी पुनर्वसनाची लढाई कातकरी लढत आहेत.

या लढ्याला यश मिळू लागले असून कणकवली गणपती साना येथील कातकऱ्यांच्या घरात वीज आली आहे.

फोंडाघाट गांगोवाडी तसेच करंजे येथीलही घरांना आठवडाभरात वीजजोडणी देण्याची तयारी महावितरणचे अधिकारी युद्धपातळीवर करीत आहेत.

२८ डिसेंबर रोजी वीज,पाणी,घर यासहित पुनर्वसनाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आदोलन केले होते.

यावेळी अधिकाऱ्यांसमवेत संघटना प्रतिनीधींशी झालेल्या बैठकीत २६ जानेवारीपर्यंत वीज जोडणी मिळण्याबाबत निर्णय करण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी वीज जोडण्या देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदिवासी कातकरी लोकसमूहाच्या कुडाळ, देवगड, कणकवली या तालुक्यांमध्ये वस्त्या आहेत. यामध्ये देवगड, कुडाळ तालुक्यात काहीशा प्रमाणात येथील लोकांच्या घरांचे आणि काही मूलभूत गरजांचे प्रश्न सोडविले गेले आहेत.

कणकवली तालुक्यातील वस्त्यांचे प्रश्न आजही गंभीर आहेत. काही काळापूर्वी शहरात कोणतीही चोरी झाली कि या वस्त्यांमधील लोकांना उचलून नेले जात होते. पोलिसांच्या लेखी कायमचे गुन्हेगार असलेल्या या लोकांकडे पाहण्याचा पोलिसी यंत्रणेचा दृष्टीकोन अलीकडच्या काळात बदलला.

मात्र शहराच्या पोटातील हि वस्ती शहरात असूनही तशी गावकुसा बाहेरच आहे. खरंतर आता येथील विजेचा प्रश्न सुटला, माणूसपणाचा अजूनही कायम आहे !

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment