देश-विदेश राजकारण

गोव्यात काँग्रेसने उमेदवारांना पाठवले रिसॉर्टवर, तर भाजपच्या गाठीभेटी सुरु

गोव्यात काँग्रेसने उमेदवारांना पाठवले रिसॉर्टवर, तर भाजपच्या गाठीभेटी सुरु

 
विवेक ताम्हणकर, कोंकण 


गोवा विधानसभेचा निकाल काही तासांवर असताना गोव्यात काँग्रेस हाय अलर्टवर आहे. काँग्रेसने पक्षांतराच्या भीतीने आपले उमेदवार एका हॉटेलमध्ये आणून ठेवले आहेत. तर भाजपाने जोरदार गाठीभेटी सुरु केल्या आहेत. निवडणूक पोलच्या अंदाजानुसार मागच्याच प्रमाणे काँगेस जास्त जागा निश्चित मिळवेल मात्र सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचणे कठीण जाईल. मात्र मागच्या प्रमाणे आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेस जोरदार खबरदारी घेत आहे. 


गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पक्षांतराच्या भीतीने काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. गोवा काँग्रेसने पक्षांतराच्या भीतीने आपले उमेदवार रिसॉर्टमध्ये पाठवले आहेत. 10 मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीच्या निकालापूर्वी, कॉंग्रेसने ‘पक्षांतर’ रोखण्यासाठी आत्तापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

किंबहुना, 2017 च्या विधानसभा निवडणुकीची चूक पक्षाला पुन्हा करायची नसल्याचे सांगण्यात येत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यांना सत्ता स्थापन करता आली नव्हती.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गोव्यात 40 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या, परंतु 13 जागा जिंकूनही भाजपने छोट्या पक्षांना आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले होते. दोन वर्षांनंतर काँग्रेसचे १५ आमदार विरोधी पक्षनेते बाबू केवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये गेले. त्यानंतर कवळेकरांना भाजपने उपमुख्यमंत्री केले होते.


सरकार स्थापनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून चिदंबरम, गुंडू राव यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असून, आघाडीच्या संभाव्य भागीदारांशी उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोव्यात दाखल झाले आहेत.

यातच 40 विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या गोव्यात कॉंग्रेसला 12-16, भाजपला 13- 17, आम आदमी पक्ष 1-5 आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाला 5-9 तर इतर 0-2 जागा मिळतील असे काही माध्यमांच्या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.


गोव्यात 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.


गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाओ, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत, भाजप नेते रवी नाईक, अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत यंदाची लढत चुरशीची आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांचे कडवे आव्हान आहे. 


10 मार्चनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला मोलेम येथील तीन रेषीय प्रकल्प, आयआयटी-गोवासाठी जमिनीचे वाटप आणि नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी यासह अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर ठोस निर्णय घ्यावे लागतील.

2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने या मुद्द्यांवरील निर्णय पुढे ढकलले, जेणेकरुन जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागू नये.


दरम्यान, भाजप आणि कॉंग्रेस यांच्या सत्तेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. तर दुसरीकडे गोव्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने तृणमुल कॉंग्रेसबरोबर युती केली आहे.

10 तारखेनंतर कोणत्या पक्षाला आपला पाठिंबा द्यायचा हे लवकरच ठरवणार असल्याचे महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाचे प्रमुख सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्री बनू देणार नसल्याचे देखील ढवळीकरांनी यावेळी म्हटले आहे.


दरम्यान निकालाला काही तास उरले असताना गोव्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संभाव्य सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली आहे. मात्र काही तासांवर आलेला निकाल गोव्याची खुर्ची कोणाकडे हे स्पष्ट करेल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment