कोंकण

पोलीस भरतीमध्ये होमगार्ड जवानांवर अन्याय..

ठाणे – २०१९ पासून भरती झालेल्या आणि कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावलेल्या होमगार्ड (गृहरक्षक दल) जवानांवर पोलीस भरती प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा आरोप होमगार्ड यांच्याकडून केला जात आहे. होमगार्डमध्ये तीन वर्षे अखंडीत सेवा बजावलेल्यानाच या भरती प्रक्रियेत ५ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. या पोलीस भरती सुरू होण्यापूर्वीचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे भरतीच्या या संधीपासून वंचित राहिलेल्या होमगार्डनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालत शनिवारी ठाण्यात निदर्शने करून आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली.

१ डिसेंबर २०१९ रोजी होमगार्ड म्हणजेच महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक म्हणुन गृहरक्षक दलात २५०० जवान भरती झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून हे होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा बजावताना पाहायला मिळाले. कोरोना काळात देखील या गुरक्षक दलाने जीवाची बाजी लावुन कर्तव्य बजावले. ३ वर्ष सेवा केल्यानंतर या होमगार्डना १ डिसेंबर २०२२ रोजी ठाणे जिल्हा गृहरक्षक दलाचे सदस्यत्व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस भरतीच्या जाहिरातीच्या अध्यादेश निघाला मात्र या निघालेल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीच्या अध्यादेशामध्ये पोलीस भरती सुरू होण्यापूर्वीचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या अध्यादेशामुळे अडीच हजार होमगार्ड या भरतीपासुन वंचित राहणार आहेत. गृहरक्षक सद्स्यत्व प्रमाणपत्राचा लाभ सध्या सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रीयेमध्ये घेता येत नसून २०२२ या वर्षात कार्यरत असलेल्या अनेक होमगार्ड जवानांची वयोमर्यादा उलटुन जात आहे, त्यामुळे आगामी पोलीस भरतीसाठी हे जवान पात्र ठरू शकणार नाहीत. तेव्हा, सध्या सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गृहरक्षक सद्स्यत्व प्रमाणपत्राच्या अनुषंगाने ५ टक्के आरक्षणाचा लाभ या अडीच हजार होमगार्डना देण्याबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी ठाण्यातील होमगार्ड जवानांनी शनिवारी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली.

या प्रकरणी सर्व होमगार्ड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणी माहिती देत निवेदन देत पत्रव्यवहार केला आहे. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या होमगार्ड यांना या विषयावर विचार करणार असल्याचे सांगितले. मात्र या पत्रव्यवहारावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने हे होमगार्ड हतबल झाले आहेत. आता रस्त्यावर उतरून संविधानीक पद्धतीने निदर्शने सुरू केली असून त्यानंतरही मुख्यमंत्र्यानी वा संबधितांनी लक्ष घालावे अन्यथा आगामी निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा इशारा या संतप्त होमगार्ड जवानांनी दिला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment