अमरावती/प्रतिनिधी
नवाथे वीज उपकेंद्रावरील कालीमाता फिडरचे द्वार उघडे असल्याने त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
नवाथे उपकेंद्राला याबाबत तक्रार देऊन सुद्धा अधिकारी व कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.फिडर मधील तारा उघड्यावर असल्याने वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्याचा प्रकार देखील वाढला असून वीज वितरण कंपनीने या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कालीमाता फिडर हा उपकेंद्रावरील शेवटचा भाग असल्याने वीज कर्मचारी याठिकाणी येण्याची तसदी घेत नाहीत.
सोमवारी सकाळी एक फ्यूज निकामी झाला होता त्यामुळे दिवसभर शेकडो तक्रारी व संपर्कानंतर सायंकाळी सात वाजता तो फ्यूज बसविण्यात आला होता. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना तासनतास विजेची प्रतीक्षा करावी लागते. शहरातील भाग असून सुद्धा आदिवासी बहुल भागासारखी परिस्थिती याठिकाणी असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. येण्याजाण्याच्या मुख्य मार्गावर ही डीबी असून डीबी ला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही.
परिसरातील लहान मुले याठिकाणी खेळत असतात, उघडी डीबी अपघाताला निमंत्रण देत असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही डीबी सुरक्षित करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
या फिडरवर शुभम ले आउट आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे वीज कनेक्शन आहे. शुभम ले आउट मधील मोजक्या नागरिकांचे कनेक्शन असून केवळ झोपडपट्टी परिसर असल्याने अधिकारी किंवा कर्मचारी या परिसरातून आलेल्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे.