सातारा – सातारा – पुणे राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगद्यात कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पुण्यातील सराफ कुटुंबीय इनोव्हा कार (क्र. एमएच १४ डीएफ ६६६६) ने गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीला खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली आहे.