पुणे – पुण्यातील खुनाचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. कोथरूड मध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात कारणावरून तरुणाचा खून करून मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकवून आत्महत्या भासवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
परेश शंकर कंधारे ( वय २८ रा. स्मिता हाईट्स, लोकमान्य कॉलनी परमहंस नगर , कोथरूड ) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी वसंत अवसारे याच्यावर कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यासंदर्भात मयत यांचे मामेभाऊ कुंदन बापू अडसूळ ( वय ३६ रा. सागर कॉलनी , कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आरोपी वसंत आणि मयत परेश हे दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. त्यानंतर या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून भांडण झालं. हे भांडण इतक्या टोकाला गेलं की आरोपी वसंतने परेशचा गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर हा खून वाटू नये आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने शालीच्या सहाय्याने परेशचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकवला. हा सगळा प्रकार मंगळवारी पहाटे ४ ते बुधवारी सकाळी आठ पर्यंत घडला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.एस राठोड करत आहेत.