पश्चिम महाराष्ट्र

मुश्रीफ यांच्या बॅंक खात्यात कोट्यावधी रुपये कसे? -किरीट सोमय्या

कोल्हापूर – माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बॅंक खात्यात ४९ कोटी ८५ लाख रुपये कसे आले ॽ असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. कारवाई झाल्यावर मुश्रीफांना धर्म कसा आठवतो ? असाही प्रश्न उपस्थित केला. किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्याने मुश्रीफ यांच्यावर आरोप केले.

आर्थिक घोटाळा करताना मुश्रीफांना धर्म आठवत नाही. पण त्यांच्या बँक खातात कोलकत्ता येथील कंपन्यांकडून ४९ कोटी ८५ लाख रुपये कसे जमा झाले हे त्यांनी कोल्हापूरच्या जनतेला सांगावे. कोल्हापूरची जनता त्यांना सात जन्म नमस्कार करेल, असा टोला सोमय्यांनी लगावला. सोमय्या म्हणाले, रजत आणि माउंट कॅपिटल या दोन संस्था गेली दहा ते बारा वर्षे बंद आहे. दोन्ही कंपन्या बंद असताना कोल्हापुरातील एका बँकेतील मुश्रीफ यांच्या खात्यावर कोट्यावधी रुपये जमा झालेले आहेत.

ग्रामविकासमंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या कंपनीच्या नावे राज्यातील ८०० हून अधिक ग्रामपंचायतीने दरवर्षी ५०  हजार रुपये भरावेत असा आदेश काढला होता. नंतर हा आदेश रद्द करण्यात आला. पण त्या कामाची वर्क ऑर्डर काढली होती. दरवर्षी मुश्रीफांच्या जावयाच्या कंपनीत १५०  कोटी रुपये तर दहा वर्षात पंधराशे कोटी रुपये जमा झाले असते. ही प्रक्रिया रद्द झाली असली तरी या प्रकरणाची चौकशी करावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे. मुश्रीफांचीआयकर, ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असेही सोमय्याने स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, राहुल चिकोडे ,सरचिटणीस अशोक देसाई, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment