महाराष्ट्र राजकारण

कोल्हापूर जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांचीच बाजी

स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला चार जागा

गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. मे महिन्यात झालेल्या गोकुळच्या निवडणुकीनंतर जिल्हा बँकेत राजकीय पट बदलेल की सत्ताधारीच किंग होतील याची चर्चा होती. तर गेल्या महिन्यात विधानपरिषद निवडणुकीत भाजपने एक पाऊल मागे घेत काँग्रेसला जागा दिल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. याचाही परिणाम जिल्हा बँकेतील जयपराजयावर होणार हे निश्चित होते.

By अनुराधा कदम

बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न करूनही अत्यंत चुरशीने झालेल्या व जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रतिष्ठेचा कस लागलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ५ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ९८ टक्के मतदान झाले होते. निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. ७ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीअंती अखेर सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलने बाजी मारत ११ जागांवर बाजी मारली. राज्यात महाविकासआघाडीत असलेल्या शिवसेनेने ऐनवेळी सवतासुभा मांडत तीन जागांवर वर्चस्व मिळवलं असून विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला चार जागांवर विजय मिळवता आला. जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, ए. वाय. पाटील, अमल महाडिक यांची बिनविरोध निवड  झाली आहे.

काही ठिकाणी सत्ताधारी पॅनेलने आपला गड कायम राखला असून काही ठिकाणी मात्र धक्कादायक निकाल लागला आहे. शहकाटशहाचे चित्र जिल्ह्यात दिसून आल्याने प्रस्थापितांना धक्का लागला तर काही सर्वसामान्य उमेदवारांना विजयाच्या गुलालाची संधी मिळाली. गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. मे महिन्यात झालेल्या गोकुळच्या निवडणुकीनंतर जिल्हा बँकेत राजकीय पट बदलेल की सत्ताधारीच किंग होतील याची चर्चा होती. तर गेल्या महिन्यात विधानपरिषद निवडणुकीत भाजपने एक पाऊल मागे घेत काँग्रेसला जागा दिल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. याचाही परिणाम जिल्हा बँकेतील जयपराजयावर होणार हे निश्चित होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जसजसा निकाल जाहीर होईल तसा जल्लोष होत होता.

आजऱ्यातून सत्ताधारीच्या सुधीर देसाई यांनी विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा पराभव केल्याने हा निकाल धक्कादायक ठरला. तर प्रकाश आवाडे यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. गडहिंग्लज तालुक्यातही माजी उपाध्यक्ष अप्पा पाटील यांना नामुष्कीजनक पराभव मान्य करावा लागला असून या विभागात संतोष पाटील यांनी विजयाची कमान सर केली.  जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते ते शिरोळ तालुक्याकडे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवत गणपत पाटील यांना कट्ट्यावर बसवले. शाहूवाडी तालुक्यातील निकालाही अनपेक्षित झालर मिळाली असून येथे शिवसेनेच्या रणवीर गायकवाड यांनी विद्यमान संचालक सर्जेराव पाटील यांना पराभवाची धूळ चारली. अपेक्षेप्रमाणे विनय कोरे यांनी विजयाचा गड कायम राखल्याचे चित्र आहे. विरोधी परिवर्तन आघाडीच्या खासदार संजय मंडलिक यांनी स्वतःच्या विजयासोबत शिवसेनेला तीन जागा देण्यात बाजी मारली. प्रकाश आवाडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला होता मात्र निकालात आवाडे यांना साथ मिळाली नाही व त्यांचा प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी पराभव केल्याने त्यांच्यासाठी येत्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या कारभाराची दारे बंद झाली. निवेदिता माने यांना पुन्हा संचालक होण्याची संधी महिला प्रतिनिधी मतदारांनी दिली तर याच गटातून सर्वसामान्य कुटुंबातील श्रृतिका काटकर यांनाही विजयाने गवसणी घातली. स्मिता गवळी यांनाही या निवडणुकीत विजयाची चव चाखता आली.

माजी खासदार राजू शेट्टी यांना होमपीचवरच भुईसपाट होण्याची वेळ आल्याने शेट्टी समर्थकांना धक्का बसला आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयातच शेट्टी यांचे अपयश आहे.  ठराव धारक गटातील मतदारांनी यड्रावकरांना हिरवा कंदील दिला आहे. शिरोळ तालुक्यात शेट्टी यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यात यड्रावकर यांना यश आले असं सांगणारा हा निकाल धक्कादायक आहे.  त्याचप्रमाणे करवीर तालुक्यातही धक्कादायक निकालाने जयपराजयाची गणिते बदलली आहेत. यामध्ये शिवसेना व शेकापला संधी देण्यात आली होती पण भैय्या माने यांनी क्रांतिसिंह पाटील यांचा पराभव करून तर विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांचा पराभव करून करवीरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राखले.  जागा वाटपातून मतभेद झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी शिवसेनेचा सवता सुभा मांडून महाविकास आघाडीला छेद दिला होता. गोकुळनंतर शिवसेना व शेकाप यांचा गट सक्रिय झाला होता मात्र रवींद्र मडके व क्रांतिसिह पाटील यांना ब्रेक लागल्याने सेना व शेकापची करवीरमध्ये पिछेहाट झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने कडवी झुंज दिली असली तरी गटातटाच्या राजकारणात याचा परिणाम दिसणार आहे.  सत्ताधारी पॅनेलने या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केली असली तरी भाजपला या निवडणुकीत धक्का बसल्याने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

हे आहेत विजयी उमेदवार

सत्ताधारी आघाडीचे विजयी उमेदवार-  राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू आवळे, विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, भैय्या माने, स्मिता गवळी, निवेदिता माने, श्रृतिका काटकर, विजयसिंह माने

विरोधी आघाडीचे विजयी उमेदवार- संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अर्जुन आबिटकर

अपक्ष-  रणवीरसिंह गायकवाड

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील, राजेश पाटील, ए. वाय. पाटील, अमल महाडिक

चौकट
सत्ताधा-यांना विरोधकांची कडवी झुंज

विकास सेवा गटातून सुधीर देसाई, रणवीर सिंह गायकवाड, राजेंद्र पाटील यड्रावकर, रणजित पाटील, संतोष पाटील, विनय कोरे यांनी विजयाचा झेंडा रोवला.  इतर मागासवर्गीय गटातून विजयसिंह माने यांची संचालकपदी वर्णी लागली तर अनुसूचित जाती गटातून राजूबाबा आवळे यांनी विजय पटकावला. कृषीपणन गटातून खासदार संजय मंडलिक यांनी व बाबासाहेब पाटील यांनी विजय खेचून आणला. नागरी बँक पतसंस्था गटातून अर्जुन आबिटकर यांनी गुलाल उधळला. इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून प्रताप उर्फ भय्या माने यांना यश आले. महिला प्रतिनिधी गटातून माजी खासदार निवेदिता माने व  सर्वसामान्य कुटुंबातील श्रृतिका काटकर या संचालकपदी निवडणूक आल्या.
एकंदर या निकालाचे चित्र पाहता सत्ताधारी आघाडीला विरोधी आघाडीने कडवी झुंज देत आपली ताकद दाखवून दिली आहे. या निकालातून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पडसाद दिसून येतील.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment