कोल्हापूर – राज्य शासनाने वीज क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले. कायम कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचार्यांचाही संपात सहभाग आहे. जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ६०० वीज कर्मचारी अभियंता अधिकारी संपावर गेल्याने महावितरणची यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी एक वाजता सह्याद्री अतिगृहात राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास बुधवारी संप स्थगित केला जाऊ शकतो. महावितरणच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दि. ४ जानेवारीपासून राज्यभर अधिकारी, अभियंते व कर्मचारी ४ ते ६ जानेवारी या कालावधीत ७२ तास कामबंद आंदोलन करणार आहेत. सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या भूमिकेविरोधात कामगार संघटना आक्रमक बनल्या आहेत.
तर महावितरण डोलारा कोसळेल
महावितरणच्या एकूण ३४ टक्के वीज विक्रीवर आणि ४६ टक्के महसुलावर प्रस्तावित खासगी कंपन्यांचा डोळा आहे. प्रस्तावित समांतर परवाना असणार्या क्षेत्रात खासगी कंपन्या ८ रुपये प्रतियुनिट दराने बिल आकारणार आहे. तर महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात हाच दर ५ रुपये २० पैसे राहणार आहे. क्रॉस सबसिडी धोरणामुळे शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना स्वस्तात मिळणारी वीज खासगीत मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. शिवाय महावितरणचा डोलारा कोसळण्याचा धोका असल्याचा आरोप कामगार संघटना कृती समितीने केला आहे.
महावितरणचे पॉवरलूम असो.ला आवाहन
इचलकरंजी महावितरण कार्यालयातील कर्मचार्यांनी खासगीकरणाविरोधात मंगळवार ४ च्या मध्यरात्रीपासून शुक्रवार ६ पर्यंत काम बंद आंदोलन पुकारलेले आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी महावितरणचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरू करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉवरलूम असोसिएशनने सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकार्यांनी केले आहे.
संपात कंत्राटी वीज कर्मचार्यांनी सहभागी होऊ नये
महावितरणमधील कायम सेवेतील कर्मचारी, अधिकारी, अभियंता या संघटनांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. हा संप कायम कर्मचार्यांचा आहे. या संपात कोणत्याही कंत्राटी वीज कर्मचार्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन पुरवठादार कंपनीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.