पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात दत्तक प्रक्रियेसाठी वेटिंग

कोल्हापूर – लॉकडाऊनच्या काळात शासनमान्य संस्थांमध्ये बालकांची संख्या घटल्याने तसेच दत्तक प्रक्रियेस बराच वेळ लागत असल्याने इच्छुक दाम्पत्यांना बाळ दत्तक मिळण्यासाठी अडीच ते तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील जिल्हा परिवेक्षक अनुरक्षण संरक्षण संघटना संचलित शिशुगृहामध्ये आधाराश्रमात चालू वर्षभरात सुमारे 21 बालके दाखल आहेत. सध्या दहा बालके दत्तक देण्यासाठी उपलब्ध असून, पुढील महिनाभरात दोन बालके दत्तक देण्याच्या अंतिम प्रक्रियेत आहेत. त्यांच्यासाठी सुमारे साठहून अधिक अर्ज प्रतीक्षा यादीत आहेत.

निराधार, अनाथ बाळ दाखल झाल्यानंतर त्यांना दत्तक देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींच्या पूर्ततेसाठीही मोठा अवधी लागत आहे. अशातच पालकांनी त्याग केलेल्या मुलांचा ताबा परत घेण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला जातो. त्या मुदतीत पालकांनी मुलावर दावा सांगितला नाही; तर बालकल्याण समितीकडून त्या बालकाला दत्तकसाठी मुक्त घोषित केले जाते.

पोलिसांकडून दाखल झालेल्या बालकांच्या पालकांचा शोध घेणे किंवा त्याला सोडून दिल्यानंतर जन्मदात्यांचा शोध घेतला जातो. सापडलेल्या दोन वर्षांपर्यंतच्या मुलांच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास दोन महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक आहे; तर दोन वर्षांपुढील वयाच्या मुलांचा तपास चार महिन्यांत होणे कायद्यात नमूद आहे. मात्र, या सर्व बाबींना जास्त दिवसांचा कालावधीही लागू शकतो. मुलं मोठी असतील, तर त्यांचा फोटो आणि माहिती माध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी लागते.

कायदेशीरपणे बाळ दत्तक घेण्यासाठी अडीच ते तीन वर्षांचा अवधी लागत असल्याने अनेक पालकांचा संयम सुटल्याचे समोर येत आहे. यातूनच बेकायदेशीरपणे मूल दत्तक घेणार्‍यांचेही प्रमाण वाढल्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रणालीनेच पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिवेक्षक अनुरक्षण संरक्षण संघटना संचलित शिशुग्रहाच्या समन्वयक मीना कालकुंद्रे यांनी केले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment