कोल्हापूर – कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर मेगा ट्रॅफिक ब्लॉक संपल्याने रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. नॉन इंटरलॉकिंग प्रणालीसह काम पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर मेगा ट्रॅफिक ब्लॉक बुधवारी रात्री संपल्याने रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. गुरुवारी कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-पुणे पॅसेंजर ट्रेन या दोन अपवाद वगळता सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या. चार नंबरच्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यमान दोन प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकात मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. नॉन इंटरलॉकिंग प्रणालीसह काम पूर्ण झाले आहे.
स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून १०० टक्के सर्व नियोजित गाड्या टर्मिनसवर (Chhatrapati Shahu Maharaj Terminus Kolhapur) येतील आणि सुटतील. बांधलेले नवीन प्लॅटफाॅर्म लवकरच लोकांसाठी खुले केले जाईल. शाहू टर्मिनसवरून दररोज १५ गाड्या धावतात, त्यात ५ एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील नवा प्लॅटफॉर्म क्रमांक चारचा वापर प्रत्यक्ष सुरू करण्यात आल्यानंतर कोल्हापूर कलबुर्गी एक्स्प्रेस सुटली. या प्लॅटफॉर्ममुळे स्थानकातून नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्गाचा मोकळा झाला आहे. या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे काम २०१९ मध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीने काम थांबल्याने गेल्या वर्षभरापासून वेगाने पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. या कामाचा अंतिम टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने २१ डिसेंबरपासून आठ दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला होता.