पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर ते गगनबावडा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

कोल्हापूर – गगनबावडादरम्यानचा रस्ता महामार्ग म्हणून घोषीत केला असला, तरी इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसार या रस्त्याचे अद्याप रुंदीकरण, मजबुतीकरण न झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. कोल्हापूर- कळेदरम्यानच्या रस्त्याचे दुपदरीकरण होणार असून कळे ते गगनबावडा या मार्गाचे दुपरीपदरीकरण का नाही, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना अपंगत्व आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे.

कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने या रस्त्याची देखभाल, दुरुस्ती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आली आहे. मात्र, या विभागात कार्यकारी अभियंता आणि केवळ एकच उपअभियंता कार्यरत आहेत. अधिकार्‍यांना वाहनांची सोयही नाही. त्यामुळे रस्त्यावर देखरेख करणार कसे, अशी विचारणा अधिकार्‍यांतून होत आहे. महामार्ग घोषित केला असला, तरी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी काँक्रिटचा रस्ता असला तरी तेथेही खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लहान-लहान खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. कोकणात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावरून रोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. कळे गगनबावडा या अंतरामध्ये सांगशी सैतावडे, पळसंबे, असळज, खोकुर्ले, शेणवडे, मांडुकली, मार्गेवाडी साळवण, निवडे, खाडुळे, परखंदळे अशा १२ ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. ही वळणे काढण्यासाठी भूसंपादन आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भूसंपादनासह रस्ता दुपदीरकणाचा प्रस्ताव तयार करून रस्ता सुस्थितीत करावा, अशी स्थानिकांतून मागणी होत आहे.

या महामार्गावर गेल्या दीड वर्षात विविध वाहनांचे ८३ अपघात झाले आहेत. या अपघात ५४ जणांना जीव गमवावा लागला आहे. २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचे प्रमाण पाहता हा रस्ता नसून मृत्यूचा सापळा असल्याची भावना वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment