पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात आजपासून १५ दिवस जमावबंदी

कोल्हापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (Section 144) आदेश लागू झाला आहे. कोल्हापुरात 15 दिवसांसाठी जमावबंदी असेल. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असेल. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल (8 डिसेंबर) जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. १५ दिवसांसाठी हा आदेश लागू असेल . आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाच्या निषेधार्थ शनिवारी (10 डिसेंबर) कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते. 

दरम्यान जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी १० डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चावर प्रशासनाचा अंकुश असण्याची चिन्हे आहेत . महाविकास आघाडीने केलेली मोर्चाची घोषणा आणि जिल्हा प्रशासनाने लागू केलेला जमावबंदी आदेश यामुळे प्रशासन आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे .

तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान, महाराष्ट्रातून बाहेर जाणारे प्रकल्प, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीनं राज्य सरकारविरोधात मुंबईत 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment