पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात भरला कंदमुळांचा उत्सव

कोल्हापूर – तांबडे कोन, डुक्कर कोन, कोराडू, काटे कणंग, मुंदू चिरके, कासार अळू, आळेकोन” ही सगळी नाव तशी अपरिचित, शहरवासीयांना नवीन. साहजिकच उत्सुकता वाढवणारी. पण ही आहेत रानकंदमुळे. कोल्हापुरात पहिल्यांदाच कंदमुळांचा उत्सव भरला आहे. तब्बल साठ प्रकारची कंदमुळे या प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत.

एनजीओ कंपेशन, निसर्ग अंकुर कोल्हापूर, गार्डन क्लब यांच्या पुढाकाराने आणि शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या शहाजी कॉलेजच्या सहयोगाने कोल्हापुरात कंदमुळांचा हा दोन दिवसीय अनोखा उत्सव भरविण्यात आला आहे. गुरुवारी ( बारा जानेवारी ३०२३) सकाळी दहा वाजता या उत्सवाला सुरुवात झाली. शहाजी कॉलेजच्या परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हे प्रदर्शन सुरू आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी.टी. शिर्के यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. प्राचार्य डी. आर. मोरे, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लई, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संयोजक प्राचार्य मधुकर बाचुळकर, मिलिंद धोंड, मोहन माने, कल्पना सावंत, सुशांत टककळकी, अमृता वासुदेवन, मंजिरी कपडेकर, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेखान शानेदिवाण,  जयेश ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले

 “निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना व्हावी” या उद्देशाने प्रदर्शन आयोजित केले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा पर्यावरणपूरक उपक्रम होत आहे. प्रदर्शनात ६० प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी केली आहे ” असे मिलिंद धोंड यांनी सांगितले. 

 निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले “निसर्गातील दुर्मिळ अशा कंदमुळांची ओळख घडावी या उद्देशाने प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनात कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार, हळदीचे विविध प्रकार आहेत. ” प्रदर्शन बारा जानेवारीला रात्री आठ वाजेपर्यंत खुले आहे. तेरा जानेवारी  सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळी प्रदर्शन खुले राहील.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment