पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात भरणार इंडियन डेअरी फेस्टिवल

कोल्हापूर – पश्चिम भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवलला शुक्रवारपासून  (२० जानेवारी) पासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे दूध परिषद होत आहे. दूध परिषदेचे सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन डेअरी फेस्टिवल चे निमंत्रक गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली आहे. 

शुक्रवारी हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेच्या उद्घाटनाने इंडियन डेअरी फेस्टिवल ला सुरुवात होईल. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख मार्गदर्शन करतील. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत.

दुपारी तीन वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रामध्ये पशुसंवर्धनाचे नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावर परम सिंग (संस्थापक, मु फार्म प्रा. लि.), डॉ. शांताराम गायकवाड (व्यवस्थापक, गोविंद मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्ट), डॉ. दयावर्धन कामत (वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, गोकुळ दूध संघ), डॉ. प्रफुल्ल माळी (पशुसंवर्धन तज्ज्ञ) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.

संध्याकाळी ४ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाच वाजता दूध परिषदेचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 

शाहूपुरी जिमखाना येथे प्रदर्शन 

२० ते २२ जानेवारी दरम्यान शाहूपुरी जिमखाना येथे इंडियन डेअरी फेस्टिवलचे प्रदर्शन होणार आहे. येथे दुग्ध व्यवसायातील देशभरातील १०० हून अधिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी दूध व्यवसायिकांना दुग्ध व्यवसायातील होत असलेली बदल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.  

 लकी ड्रॉ पद्धतीने भरघोस बक्षिसे

 इंडियन डेअरी फेस्टिवल ला भेट देणारे दूध उत्पादक शेतकरी, व्यवसायिक यांच्यासाठी लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये प्रवेश करताना संबंधितांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे. यामधून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी म्हैस, द्वितीय क्रमांकासाठी चाफ कटर, तृतीय क्रमांक साठी मिल्किंग मशीन आणि उत्तेजनार्थ १०विजेत्यांना सायलेज बॅग देण्यात येणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment