पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात प्रथमच भव्य इंडियन डेअरी फेस्टिव्हल

कोल्हापूर – इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०२३ रोजी इंडियन डेअरी फेस्टिवल – २०२३ चे आयोजन केले आहे. “नांदी नव्या धवल क्रांतीची” हे घोषवाक्य घेऊन आणि सद्यस्थितीतील पशुधन आणि डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि यातून फायदेशीर पशुपालन आणि डेअरी उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात प्रथमच अशा प्रकारच्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. चेतन नरके यांनी दिली.
 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. नरके म्हणाले देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंतची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ, सर्व घटक आणि शासन व्यवस्था यांना एकत्रित घेऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन केले आहे. या सोबत दूध उत्पादक शेतकन्यापासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदानावर भव्य डेअरी एक्स्पो होणार आहे. या उद्योगात काम करणाऱ्या आणि हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना पशुसंवर्धन आणि डेअरी उद्योगाची माहिती करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे एका व्यापक चळवळीत रूपांतर करण्यासाठी विविध माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पुढील एका वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. नव्या पिढीचा सहभाग या क्षेत्रात वाढवण्यासाठी या उद्योगाचे अर्थकारण, तंत्र, महत्व आणि मार्गदर्शन समजून देण्यासोबत सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेअरी उद्योगाचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने या फेस्टिवलचे महत्व अनन्यसाधारण आहे.

यावेळी चितळे डेअरीचे गिरीश चितळे, वारणा डेअरीचे अनिल हेरलेकर, भारत डेअरीचे, किरीटभाई मेहता, थोरात डेअरीचे आबासाहेब थोरात, विराज डेअरीचे विशाल पाटील, गोविंद डेअरीचे, संजीवराजे निंबाळकर, राजारामबापू दूध संघाचे नेताजीराव पाटील, कुटवळ डेअरीचे प्रकाश कुटवळ, थोपटे डेअरीचे नितीन थोपटे, समाधान डेअरीचे राहुल थोरात, विमल डेअरीचे सुभाष मयेकर, दत्त इंडिया डेअरीचे सबर्जित आहुजा, गोकुळ दूधचे चेतन नरके, मयुरेश टेक्नोलॉजीचे संजीव गोखले यांच्यासह विविध डेअरीचे अधिकारी उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment