कोल्हापूर – अलीकडे भटक्या कुत्र्यांच्या वावर अधिकच वाढत चालला आहे. यासाठी रोटरी सनराईज व चंद्रकांत हंजारीमलजी राठोड परिवार व कणेरी मठ यांच्या सामूहिक प्रयत्नातून कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील पहिली भटक्या कुत्र्यासाठी श्वान शाळा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यात ४०० भटक्या कुत्र्यांना आश्रय दिला जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत अनेक विधायक कामे आणि विविध सामाजिक उपक्रम संस्थेने राबविले आहेत. गतवर्षी रोटरीच्या कार्यकारिणीने विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. त्याची पूर्तता यावर्षांमध्ये होत आहे. यात कणेरी मठ येथे श्वान शाळा प्रकल्प उभारणी करण्यात आला आहे.
दरम्यान, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर साठी अद्ययावत असे मेंदूवरील जटील शस्त्रक्रियेसाठी ६५ लाख रुपये किमतीचे ‘न्यूरो मॉनिटरिंग मशीन’ द रोटरी फाऊंडेशन व मादागास्कर रोटरी क्लब व रोटरी सनराईज यांच्या सहकार्यातून देण्यात येणार आहे. कॅन्सर तपासणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे ‘मॅमोग्राफी युनिटफ प्रदान केले जाणार आहे. पर्यावरण रक्षण व जलसंवर्धनासाठी रोटरी सनराईजने ६० लाख रुपये खर्च करून कणेरी मठ येथे तीन ठिकाणी अद्ययावत असे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. विविध विकासात्मक उपक्रम रोटरी सनराईजने राबविले आहेत. सर्व उपक्रमांचे उद्घाटन कणेरी मठ येथे दि. १९ जानेवारीला सकाळी १० वाजता काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते होणार आहे.
श्वान शाळा प्रकल्पात भटक्या कुत्र्यांचे पालन पोषण केले जाणार आहे. एक आगळा-वेगळा प्रकल्प सुरू केला जात आहे. प्रकल्पासाठी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. भारतात प्रथमच मोठ्या प्रमाणात श्वानाची शाळा रोटरीतर्फे उभारली जात आहे. भविष्यात गरज असल्यास श्वानांची शाळा वाढवून कुत्र्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न रोटरी सनराईज क्लबचा असणार आहे.