पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात सात प्रजातींसह शेकडो परदेशी पाव्हणे

कोल्हापूर – नेचर कॉन्जर्वेशन सोसायटी (नेकॉन्स) या संस्थेतर्फे बर्ड्स ऑफ कोल्हापूर आणि निसर्ग अंकूर या दोन संस्थांच्या साथीने रंकाळा तलाव परिसरात पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी 7 स्थलांतरित प्रजातींसह 29 प्रजातींच्या एकूण 158 पक्षी आढळून आले. रंकाळ्याच्या पाणथळ भागात अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी वास्तव्यास आहेत. यंदाच्या डिसेंबर महिन्यात रंकाळा तलावावर याआधी झालेल्या पक्षीनिरीक्षणामध्ये सुमारे 30 हून अधिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे. यातील बहुतांश पक्षी हे पाणथळ परिसंस्थेच्या (Wetland ecosystem) जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच या कार्यक्रमात सहभागी पक्षीनिरीक्षकांचे एक लघुचर्चासत्रही घेण्यात आले. या चर्चासत्रात नेकॉन्सचे अध्यक्ष तबरेज खान, डॉ. हर्षद दिवेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक स्वप्नील पवार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक सुहास वायंगणकर, पक्षी संशोधक अमोल लोखंडे, अभिजीत लोखंडे, विवेक कुबेर, अमोल जाधव, सतपाल गंगलमाले, संतोष शिरगावकर, कृतार्थ मिरजकर, सागर कुलकर्णी यांनी सहभाग नोंदवला.

सुहास वायंगणकर यांनी पक्ष्यांचे निरीक्षण आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास, त्यांचे निसर्गातील योगदान, त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. पक्ष्यांच्या स्थलांतरासंबंधी अमोल लोखंडे यांनी विस्मयकारक माहिती दिली. बर्डिंग ट्रेलमध्ये आढळलेल्या पक्ष्यांची माहिती अमोल जाधव आणि डॉ. हर्षद दिवेकर यांनी सांगितली. शिवाय पक्षीनिरीक्षण संपल्यानंतर पक्ष्यांची फोटोग्राफी कशी करावी आणि तिचा संवर्धनासाठी कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल कोल्हापुरातील वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रंकाळा जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असा परिसर आहे. विशेषतः विविध जातीच्या पक्ष्यांसाठी तर रंकाळा हक्काचे आश्रयस्थान आणि अन्नाचा स्रोत आहे. अनेक पक्षी घरटी करण्यासाठी आणि रात्रनिवाऱ्यासाठी रंकाळ्याच्या काठावरील झाडांचा आधार घेतात. त्यामुळे रंकाळा तलाव परिसरात भविष्यातील कोणतेही विकासप्रकल्प राबविताना तेथील नैसर्गिक परिसंस्थेला आणि त्यातील जैवविविधतेला बाधा येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

आढळून आलेले स्थानिक पक्षी
वाकरी
हळदी -कुंकू बदक
शेकाट्या
राखी बगळा
जांभळी पाणकोंबडी
खंड्या
काही स्थलांतरीत पक्षी
ब्लिथचा वेळूतला वटवट्या
पायमोज वटवट्या
ठिपकेवाली तुतारी
पिवळा धोबी
पांढरा धोबी
काळ्या डोक्याचा शराटी

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment