कोल्हापूर – खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलाला पाठविण्याचा पालकांचा कल वाढल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी शाळांवर होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या ३९ शाळा मुलांअभावी बंद कराव्या लागल्या, तर मुलांची संख्या ५० हजारांनी घटली आहे. ही बाब चिंतेची असून यामुळे सरकारी शाळांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या गावांच्या पाच ते दहा किलो मीटर अंतरावर शिक्षणाची कोणतीही सोय नाही, अशा शाळांची अवस्था मात्र चांगली आहे. या ठिकाणी मुलांची पटसंख्या अधिक आहे.
पटसंख्येवर शिक्षकांची संख्या ठरविण्यात येते. शाळांमधील मुलांची संख्याच घटू लागल्यामुळे त्याचा परिणाम शिक्षकांच्या संख्येवर झाला आहे. २०१०-२०११ मध्ये शाळांची संख्या २ हजार १३ होती ती आता १ हजार ९७४ वर आली आहे. सर्वाधिक १२ शाळा शाहूवाडी तालुक्यातील बंद झाल्या आहेत. त्यापाठोपाठ ९ शाळा भुदरगड तालुक्यातील बंद झाल्या आहेत. गडहिंंग्लज, पन्हाळा तालुक्यातील एकही शाळा बंद झालेली नाही. गगनबावडा (१) व हातकणंगले (३) तालुक्यातील शाळांची संख्या मात्र तीनने वाढली आहे.
२०१०-२०११ मध्ये शिक्षकांची संख्या ९ हजार ६०६ इतकी होती. २०२१-२२ मध्ये ती ७ हजार ५९० वर आली आहे. बंद पडलेल्या शाळांची तालुका निहाय संख्या आजरा १, भुदरगड ९, चंदगड १, कागल १, करवीर ६, राधानगरी ८, शाहूवाडी १२ व शिरोळ ४.
… अशी घटत गेली विद्यार्थी संख्या
२०१०-२०११ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या २ लाख २३ हजार ९४७ होती. २०२१-२२ मध्ये ती १ लाख ७३ हजार ४९६ झाली आहे. २०१०-११ मध्ये मुलांची संख्या १लाख १७ हजार ५९०, तर मुलींची संख्या १ लाख ६ हजार ३५७ होती. २०२१-२२ मध्ये मुलांची संख्या ८७ हजार ७३१, तर मुलींची संख्या ८५ हजार ७६५ इतकी झाली आहे.