कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा निषेध व सीमा भागातील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात शनिवारी (दहा डिसेंबर) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे सकाळी 11 ते एक या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. या माध्यमातून कोल्हापूरकरांची ताकद सीमा बांधवांच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले जाईल असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी सर्किट हाऊस येथे बैठक झाली. या बैठकीत सर्वच नेत्यांनी कर्नाटकातील भाजपच्या बोमई सरकार विरोधात हल्लाबोल केला. शिंदे- फडणवीस सरकारने सीमाप्रश्नी खंबीर भूमिका घेण्याची गरज असताना राज्यातील मंत्री गिळून गप्प आहेत अशी बोचरी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर टीका झाली.
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांच्यावर टीका केली. सीमा प्रश्न हा सध्या न्यायप्रविष्ठ असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री वादग्रस्त विधाने करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते महाराष्ट्राचे कळ काढत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता सीमा बांधवांच्या पाठीशी आहे. सीमा बांधवांना ताकद देण्यासाठी कोल्हापुरात दहा डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकातील भाजप सरकारने जनाधार गमावला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव निश्चित आहे. चाळीस टक्केचे कमिशन सरकार अशी टीका जनतेतून भाजपवर होत आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादाविषयी वादग्रस्त विधाने करत आहेत. कोल्हापुरात काही दिवसापूर्वी महाराष्ट्राने कर्नाटकातील राज्यपालांचे संयुक्त बैठक झाली होती या बैठकीचा मसुदा जनतेसमोर खुला झाला पाहिजे अशी आग्रही मागणी ही आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर नेहमीच सीमाप्रश्नसंदर्भात संघर्षाचा नारा आहे. आताही कोल्हापूरकरांची ताकत सीमा बांधवांच्या पाठीशी उभी करू या.” असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही खपवून घेणार नाही. महागाई, बेरोजगारी, भाजप सरकारची सुमार कामगिरी यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपचे मंडळी जाणून-बुजून महापुरुषांचा अपमान करत आहेत. सीमावाद हा सध्या न्यायप्रविष्ठ असताना कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर नको वक्तव्य होत आहेत. तर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार हे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे. सीमा बांधवांना ताकद देण्यासाठी संघर्षाची तयारी सर्वांनी ठेवावी.” जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी, कन्नड रक्षण वेदिकेकडून बेळगाव येथे महाराष्ट्राच्या वाहनांची जी तोडफोड केली त्याचा निषेध केला. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सीमा बांधा सोबत आहे. मोठे आंदोलन करून ताकत दाखवून देऊ.”