साहित्य

चित्राच्या दुनियेतील कोकणी माणूस “नामानंद मोडक”

विवेक ताम्हणकर, कोंकण

रस्ता आणि एसटी स्थानक कित्येकांसाठी घर असते.. कणकवलीतला नामानंद मोडक यांच्या जीवनात या गोष्टींना मोठे महत्त्व आहे. सुरंगीच्या फुलांचा गजरा म्हणजे ग्रामीण भाषेत वळेसर बनवून आणून ते ८ पैसे किमतीला विकायचे. हाच नामानंदचा उदरनिर्वाहाचा धंदा.

एस.टी. स्थानकात वळेसर विकताना १ रुपये किमतीचा फलाहारी महाराजांचा फोटो त्याने विकत घेतला. हा फोटो न्याहाळताना आपणही असं चित्र काढू शकतो, हा विचार त्याच्या मनात आला. कुणी तरी दिलेल्या काळ्या पांढऱ्या रंगातून त्याच चित्राच्या मागे त्याने फलाहारी महाराजांचे चित्र काढले.

या चित्राचे खुद्द फलाहारी महाराजांनीच कौतुक केले. आपल्यातील कलेची याच वेळी जाणीव झालेल्या नामानंदने मग रंगाचीच संगत केली. कोणीही मार्गदर्शक नाही किंवा वारसा नाही. फक्त माध्यमात अडकून न पडता कला जोपासत गेला.

कलेच्या एकाकी भ्रमंतीत अनेक नागमोडी वळणे येतात. नामानंदच्या या जीवनप्रवासात आणि कलाप्रवासात अनेक संकटे आली. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्याचे काम त्याने केले. याच प्रवासात त्याला समाजाचं जे चित्र दिसलं तेच चित्र चित्रकलेच्या माध्यमातून मांडतानाच स्वत:चं मन मोकळं करण्याचं काम त्याने केलं.

निसर्गसौंदर्य, गूढचित्र, देवतांची सुंदर चित्रे रेखाटून पैसे कमवणाऱ्या चित्रकारांची चित्रकला सर्वत्र पाहायला मिळते. परंतु मानवी चेहऱ्यामागचे चित्र रेखाटून सौंदर्याबरोबरच वास्तववादी चित्रणाचा बुरखा फाडण्याचे काम फार कमी लोक करतात.

चित्राच्या माध्यमातून कलावादाबरोबरच जीवनवादाला सोबत घेत वर्षानुवर्षे चालत आलेले या भूमीतील दारिद्रय़, उपेक्षा,  अवहेलना आणि व्यवस्थेच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या माणसांचे वास्तवातील चेहरे रेखाटण्याचे काम नामानंद मोडक करीत आहेत. कणकवलीमधील त्यांच्या स्टुडिओत शिरल्यावर हा विचार आपल्याला पटतोच.

गिऱ्हाइकाची वाट पाहत बाजारात करवंद विकत बसलेली धनगरीण, संबळ वाजवणारा गोंधळी, श्रद्धाळू नजरेचा म्हातारबा, हातात मासे व खांद्यावर जाळे टाकून निघालेला गोपाळ भोरपी, त्याच्या मुखावरील समाधान आणि खट्याळ हास्य, मातीची भांडी घडवणारा कुंभार अशी अनेक चित्रे मनात भरतात.

शिवाय चित्रातील जीवनवाद सहज आपल्या मनाला विचारांच्या गर्तेत घेऊन जातो आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या समस्यांवर भाष्य करायला लावतो. चित्रातील सौंदर्याबरोबरच जीवनवादाविषयी विचारले असता नामानंद म्हणतो, ‘‘कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो काढून बाह्य चित्र काढता येते.

ते रेखाटण्याची आवश्यकता काय? मात्र कॅमेऱ्यातून अंतर्मन रेखाटता येत नाही. माझ्या चित्रामध्ये सौंदर्य आहेच, परंतु परंपरागत दारिद्र्यात व त्याचे दु:ख जे अंतर्मनाला टोचत आलेले आहे ते रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे आणि कलाकाराला दु:ख पाहून गहिवरणारं मन नसेल तर नुसत्या कलासौंदर्याला शून्य किंमत आहे.’’

नामानंद मुळातच गरिबीचे चटके सहन करीत पुढे आलेला आहे. चित्रांमधून जसे समाजाचे जीवनविश्व तो मांडतो तसाच चिकित्सकपणे त्याच्या जीवनाकडे पाहायला लागल्यावर व चर्चा करायला लागल्यावर त्याचेही जीवनविश्व उलगडत जाते. मुळात चित्रकार होणे हे त्याचे ध्येय नव्हतेच.

किंबहुना कोणी तरी बनावे असा त्याचा विचारही नव्हता. कणकवलीमधील बोर्डवे गावात जन्मलेला नामानंद सभोवतालच्या निसर्गसंपन्न वातावरणात वाढला. अशिक्षित लोकांमध्ये मोठा झाला. जेथे जेवायची पंचाईत तेथे व्यावसायिक शिक्षण कुठचे घेणार? जेमतेम शिक्षण घेतल्यावर हाताला धरून शिकवेल असा मार्गदर्शक नसतानाही नामा उपजत प्रतिभेच्या जोरावर आणि सभोवतालच्या निसर्गाच्या मानवी जीवनाच्या निरीक्षणाच्या जोरावर संस्कारित होत गेला.

मातीतील मूर्तिकाम, काष्ठशिल्प, रंगकाम, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, धातूतील ओतकाम अशा विविध आविष्कारांतून चित्रकार म्हणून बहरत गेला. परंतु या काळात आपण कोणत्या माध्यमात काम करतो, कलर कोणते वापरतो या तांत्रिक बाबींची नामाला किंचितही माहिती नव्हती.

हातात कागद आला- चित्र काढायचं. हातात माती आली- मूर्ती बनवायची. कागद केवढाही असो, रंग कोणतेही असो. चित्र काढणे आणि वॉटर कलर, ऑईल कलर कोणत्याही कलरमध्ये रंगवणे हेच त्याला माहीत होते. यामुळे नामाच्या कॅनव्हासला मर्यादा राहिल्या नाहीत, तर रंगाचे माध्यम त्याच्यासाठी मर्यादा ठरले नाही. तो म्हणतो, ‘‘या बाबी मला फायदेशीर ठरल्या.

घरच्यांच्या अशिक्षितपणामुळे ते माझ्यावर दबाव आणू शकले नाहीत. की तू हेच कर म्हणून आणि माझ्या अशिक्षितपणामुळे मी विशिष्ट माध्यमात अडकून पडलो नाही. मी शिकलो असतो तर एकसुरी झालो असतो. आज माझा कॅनव्हास व्यापक आहे, आकाशच माझा कॅनव्हास आहे.

तो रंगवण्याचा मी विचार करत असतो’’ नामानंदने सुरवातीच्या काळात मूर्तिकामही केले. मूर्तिकलेबाबत बोलताना नामानंदचे विचार जीवनाभिमुख वाटतात. तो म्हणतो, ‘‘मूर्तीतील कलाविष्कार मी स्वीकारतो. परंतु देवतांच्या मूर्तीबाबत विचार केल्यास घरातील विटाळ असलेल्या स्त्रीमुळे उर्वरित घर, रस्ता, बस, ऑफिस विटाळत नाही तर देवघरालाच विटाळ असतो.

हा विटाळ फक्त मूर्तीमुळे मानला जातो. म्हणून मी मूर्ती झिडकारतो. मूर्तीमुळे जात, धर्मही व्यक्त होतो म्हणून मी ते नाकारतो. मात्र त्यातील कलाविष्काराचा पुरस्कारच करतो..’’ या त्याच्या विचारांमुळे सामाजिक व्यवस्थेवर तो फक्त चित्रांतूनच नव्हे तर विचारानेही ओरखडे ओढतो हे लक्षात येते.

रंग आणि रेषांशी नामानंद नेहमीच खेळत आला आहे. रंगांची समृद्धी तर त्याच्याकडे आहेच परंतु रेषांची अफाट समृद्धीही आहे. त्याने काढलेली मराठीतील नामवंत कवींची रेखाचित्रे मनात घर करतात. नामानंदच्या रेषांमधून कवींचे चेहरे रेखाटलेली चित्रे पाहताना रेषांमध्ये आपण हरवून जातो.

रेषांमधून चित्र रेखाटणं तसं आव्हानच! याबाबत नामानंद म्हणतो, ‘‘एखादे काम आव्हानात्मक वाटले तर ते आपणही करू शकतो, हा आत्मविश्वास माझ्यात होता. याच आत्मविश्वासातून ही कलासंपदा माझात आली..’’ विशेष म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेने मालगुंड येथे कवी केशवसुतांचे जे स्मारक उभारले आहे, त्यामधील एक दालन नामानंदच्या रेखाटनांतून साकारलेल्या ७० ते ८० कवींच्या रेखाचित्रांनी सजले आहे.

नामानंदच्या चित्रांची प्रदर्शने आजपर्यंत अनेक ठिकाणी भरली आहेत. पहिलेच प्रदर्शन आचरेकर प्रतिष्ठान कणकवलीने आयोजित केलेल्या १९९२ च्या नाटय़संमेलनात झाले. यानंतर गोवा कला अकादमी, जहांगिर आर्ट गॅलरी मुंबई, दिल्ली, चेन्नई इथे भरली.

मालगुंड येथे केशवसुत स्मारकात कवींच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन झाले तेव्हा कविवर्य वसंत बापटांनी या चित्रांचे फारच कौतुक केले व सुंदर कविता करून ती नामानंदला सुपूर्द केली. एका कलासक्त अवलियाला कविश्वराकडून मिळालेली ही दाद होती.

गोवा कला अकादमीमधील प्रदर्शनावेळी परदेशातील डॅनियल डिस्कॉल यांनी चित्रे खरेदी केली. यामुळे नामानंदची चित्रे साता समुद्रापार गेली.

आठ सोलो प्रदर्शनांनंतर कवींच्या रेखाचित्रांचा स्वतंत्र विषय घेऊन प्रदर्शनाचा अनुभव घेतलेल्या नामानंदने कणकवलीच्या गडनदीत भगतसिंगाच्या जीवनावर आधारित ‘ऐ वतन!’ चित्र व शिल्प प्रदर्शन भरवले.

या उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली गेली. भगतसिंगाचे क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचावेत व धर्माच्या संकुचित कल्पना, देवावरचा विश्वास, अंधश्रद्धा, माणसातले हरवत चाललेले माणूसपण विसरून माणसाने माणूस म्हणून जगावे हा संदेश पोहोचवण्याचे काम त्याने या माध्यमातून केले. यानंतर तो एवढय़ावरच थांबला नाही तर त्याला म्हैसूरमधील अंजली आश्रमाचे काम मिळाले.

भविष्यातील आपल्या वाटचालीविषयी बोलताना तो म्हणतो, ‘‘हे माध्यम एवढे व्यापक आहे की, ते जगातल्या दृष्टी असलेल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकते. यामुळे भविष्यात मी समाजजीवनातील हरवलेले चेहरे रेखाटण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या व्यवस्थेवर किंबहूना त्या व्यवस्थेतील अनिष्ट प्रथांवर चित्रांच्या माध्यमातून भाष्य करणार आहे.’’

‘‘चित्रांमधून मी आजवर मातीशी नातं सांगणारी माणसं रेखाटली. त्यांचे (आणि माझेही) प्रश्न, मातीशी नातं सांगणारे. चित्रं रंगवताना सुंदर दिसावं म्हणून मी रंगवत नाही..

आपल्या ध्येयावर अव्यभिचारी निष्ठा ठेवून मी चित्र करतो. चित्रातील आशयद्रव्याचा वास्तवातील शोध घ्यावंसं वाटतं मला, सौंदर्याचा उपमर्द न करता सत्याच्या निष्ठुर अस्तित्वाला गवसणी घालण्याची माझी धडपड असते. सतत प्रयोगशील राहण्याचा मार्ग मी निवडला आहे. एका प्रकारे, हा माझ्याही स्वातंत्र्याचा शोध आहे.’’

निसर्ग व समाजाचे बारकावे टिपणारं संवेदनशील मन, इथल्या भूमीवर अपार श्रद्धा, कलेवरील निष्ठा हेच नामानंदचे भांडवल आहे. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment