रत्नागिरी – कोकणातील शेतकरी आता आंबा काजू बागायत व भातशेतीबरोबरच आता कंद पिकाच्या लागवडीकडे वळला आहे व यातून चांगले उत्पादनही घेऊ लागला आहे. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर हा कंदपीक लागवड ग्रामबिजोत्पादन प्रयोग राबवून यशस्वी केला आहे. कमीत कमी जागेत चांगले उत्पन्न घेता येत या कंद पिकांची बियाणे विक्री ही उत्तम विक्री होऊ शकते हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. हा प्रयोग दापोली व खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरती यशस्वी झाला आहे. केवळ दोन गुंठे जागेत जवळपास ३३५ किलो उत्पन्न मिळाल आहे. सुरण या कंदपिकाची लागवड या ठिकाणी घेण्यात आली होती. कोकणात सातत्याने होणारा हवामान बदल त्यामुळे आता पीक पद्धती बदलण्याची गरज आहे यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल असं मत कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ प्राध्यापकांनी व्यक्त केल आहे. कोकणात खरीप हंगामात कमीत कमी जागेत फार कोणतीही मेहनत न घेता हे पीक उत्तमरित्या येऊ शकत हे आता स्पष्ट झाल आहे. कोकणात खरीप हंगामात भातशेती केली जाते याला मेहनत व मनुष्यबळही त्याला खूप लागत तसेच काळजीही घ्यावी लागते या सगळ्याला आता कंद पिकाची लागवड हा एक भविष्यात उत्तम पर्याय ठरू शकेल हेच या प्रयोगातून स्पष्ट झाला आहे.
खेड तालुक्यात कळंबणी,सुकीवली, दापोली तालुक्यातील सडवे,शिवाजीनगर,वाकवली, शिवाजीनर,येथील शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेऊन बियाणे कंदपिकांची बियाणे विक्री केली आहे. एक ते तीन गुंठे मध्ये ही लागवड त्यांनी केली आहे. सुकीवली येथील सूर्यकांत शंकर धाडवे ,सडवे येथील रमेश महादेव टेमकर या शेतकऱ्यांनी केवळ दोन गुंठयात ३३५ किलो, वाकवली येथील राजाराम धोंडू शिगवण यांनी केवळ एका गुंठयात २१५ किलो इतके भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे या कंद पिकाच्या लागवडीनंतर कोणतीही फवारणी अथवा कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच किलोमागे जवळपास ७० ते ८० रुपये किलो इतका दर हे मिळतो.
कोकणात पिकाच्या लागवडीसाठी पोषक असे वातावरण आहे विद्यापीठाअंतर्गत चालू असलेल्या वाकवली येथील अखिल भारतीय समन्वित कंदपिके योजनेमध्ये कोकणात होणाऱ्या विविध कंदपिकांवर संशोधन चालू आहे. या प्रकल्पाच्या संशोधनातून कणघर, रताळी, अळू, पोरकंद आदी कंद पिकाच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. तसेच विविध पिकांच्या लागवड पध्दती प्रमाणित करून त्याचीही शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा या पिकाच्या वाढीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही असं म्हणत या संशोधनाअंती नोंदवण्यात आला आहे. तसेच इतर पिकाच्या तुलनेने किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने सध्या शेतकरीवर्ग कंदपिकाच्या लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे कदापिकाच्या लागवडीसाठी कट/ रोपे / खोड याची मागणी आता वाढत आहे.
शेतकऱ्यांच्या या वाढत्या मागणीप्रमाणे त्यांना लागवडीसाठी आवश्यक कंदांचा/ रोपांचा पुरवठा करण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेणे आवश्यक होते. याकरीता विद्यापीठ प्रक्षेत्रावर बिजोत्पादनाच्या मर्यादा लक्षात घेता गतवर्षीच्या संशोधन समितीच्या बैठकीमध्ये यावर उपाययोजना सुचविण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये माजी संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी काही कंदपिकाचे उत्पादन गावपातळीवर काही निवडक शेतकऱ्यांच्या मार्फत घेण्यात यावे असे सुचविले होते त्याप्रमाणे माजी संशोधन संचालक यांच्या सूचनेनुसार कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागामार्फत कळंबणी व सुकीवली (खेड) आणि सडवे, वाकवली व शिवाजीनगर (दापोली) या गावामध्ये ‘सुरण या कंदपिकाचे ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम घेवून अशाप्रकारचे कंदपिकाचे ग्रामबिजोत्पादन विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच घेण्यात आले आहे.
या सगळ्या कंदपिकाचा आयुर्वेदातही मोठा उपयोग असून सुरणासारख्या कंदपिकाला नवीमुंबईतील वाशी मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. तसेच हे कंदपीक प्रक्रिया उद्योगात पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाते. तसेच या कंदविकांना एक्सपोर्ट साठी मोठी मागणी आहे अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कंदपीक योजनेच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा गुडदे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ जवळ बोलताना दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत प्राध्यापक डॉ.प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरती हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.