पश्चिम महाराष्ट्र

कोयना मिरजेतून आज सर्व पॅसेंजर रेल्वे रद्द

कोल्हापूर – रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म विस्तारीकरण आणि नॉन इंटरलॉकिंगच्या कामानिमित्त बुधवारी (दि.२८) मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे बुधवारी कोल्हापूर-मिरज आणि मिरज-कोल्हापूर मार्गावर धावणार्‍या सर्व पॅसेंजर रद्द केल्या आहेत. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस तर आणि कलबुर्गी-कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस बुधवारी मिरजेपर्यंत येऊन तेथूनच परत जाणार आहे.

कोल्हापुरातून पहाटे साडेपाच वाजता सुटणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस मिरजेतून सुटणार असून पुणे-कोल्हापूर गाडीही बुधवारी मिरजेपर्यंतच धावणार आहे. कोल्हापूर-सातारा ही सांयकाळी ५ वाजता सुटणारी गाडी मिरजेतून सातार्‍यासाठी सुटेल तर सकाळी पावणे दहा वाजता येणारी सातारा-कोल्हापूर ही गाडी मिरजेपर्यंतच येणार आहे. कोल्हापूर-मिरज व सांगली मार्गावरील सर्व पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस बुधवारी मिरजेपर्यंतच येईल आणि तेथून परत जाणार आहे. बुधवारी येणारी नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास हातकणंगलेत थांबविण्यात येणार आहे. मुंबईहून आलेली कोयना एक्स्प्रेसही आज मिरजेत थांबविण्यात आली. उद्या, बुधवारीही मुंबईहून येणारी कोयना एक्स्प्रेस मिरजेपर्यंत येईल. दि.२९ डिसेंबरपासून रेल्वे सेवा पूर्ववत होणार आहे.

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सीबीएसच्या बाजूच्या नव्याने उभारलेल्या प्लॅटफार्मचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे बसस्थानक ते राजारामपुरीच्या दिशेने ये-जा करणार्‍या पादचार्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातून त्यांची जीवघेणी ये-जा सुरू आहे. रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी या प्लॅटफार्मवरून ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात विटा ठेवल्या आहेत. मात्र, त्यावरून ये-जा करताना दमछाक होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment