साहित्य

क्रांत्यदर्शी जिजाऊ

दमयंती पाटील, पुणे.

जिजाबाई शहाजी भोसले म्हणजे अवघ्या मराठी मुलखाच्या जिजाऊ माँसाहेब. मध्ययुगीन काळात मराठी मुलखात स्वातंत्र्याचे स्वप्न पेरणारी, त्यासाठी मशागत करणारी आणि स्वतंत्र मराठी राज्याचे स्वप्न सत्यात आणणारी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची क्रांत्यदर्शी स्त्री. आज जिजाऊ माँसाहेबांची जयंती.

इतिहासाने आतापर्यंत जिजाबाई म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई एवढीच त्यांची ओळख सांगितली आहे. पण त्याही पुढे जाऊन पंधराव्या शतकात जन्मलेली, लढाऊ, पराक्रमी, धाडसी, स्वतंत्र विचारांच्या, स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या क्रांतिकारी स्त्री होत्या अशी ओळख होण्याला 21शतक उजाडावे लागले. शहाजी राजेंच्या मनात स्वतंत्र मराठी राज्याचे स्वप्न रुजवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले होते. शहाजीराजांनी  ते स्वप्न शिवबांच्या मनात उतरवून त्यांना जहागिरीचे पंख दिले. या पंखात बळ दिले ते जिजाऊ आईसाहेबांनी.

स्वतंत्र जहागिरीचा कारभार पहात शिवबांच्या रूपाने ते स्वप्न फुलवले आणि रयतेचे स्वराज्य स्थापन करून शिवाजी राजांना राज्याभिषेक करून ते सत्यात उतरवले. हा प्रवास सहज सोपा नव्हताच. धाडस, डावपेच, मुत्सद्देगिरी, शिस्त, निष्ठा, त्याग, बुध्दीचातुर्य या गुणांच्या जोरावर त्यांनी स्वराज्य आणि शिवबांना घडवले. यवनांच्या गुलामीत रुतलेल्या मराठी रयतेला स्वतंत्र, सार्वभौम राज्य दिले आणि ते निर्माण करणारा युगप्रवर्तक राजा दिला. हे करत असताना त्यांनी आड येणाऱ्या चालीरीती, रूढी परंपरांना कोणतीही भीडभाड न ठेवता मूठमाती दिली. जिजाऊ क्रांत्यदर्शी तर होत्याच पण बुद्धीप्रामाण्यवादी ही होत्या. त्यांच्या जीवनपटावर नजर टाकली तरी ही बाब सहज पटून जाते.

सिंदखेडचे पराक्रमी राजे लखुजीराव जाधव आणि आई म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला. त्या अत्यंत लाडाकोडात वाढलेल्या. लखुजीरावांनी आपल्या इतर मुलांप्रमाणेच जिजाबाईंना ही युध्दनिती, लढाई, तलवारबाजीचे शिक्षण दिले. हे क्षात्रतेज त्यांच्या आयुष्यभर उपयोगी पडले. 1610 मध्ये त्यांचा विवाह वेरूळच्या भोसले कुळातील शहाजीराजे यांच्याशी झाला.

शहाजीराजे मुळचेच पराक्रमी, बुध्दीमान, मुत्सद्दी होते. स्व पराक्रमाच्या बळावर त्यांनी अहमदनगर च्या निजामशाहीत मानाचे स्थान मिळवले होते. पण सत्तेतील वर्चस्वासाठी मराठा सरदार आप आपसांत लढाया खेळत. आपली दौलत, सैन्य खर्ची घालत. याचा फायदा यवनी शाह्या घेत. आपले राज्य अबाधित राखायला ते मराठा सरदारांनाच एकमेकांविरुद्ध झुंजवत. याचा पहिला बोध जिजाऊंना झाला. अहमदनगरच्या निजामशाहीत माहेरची जाधव विरुद्ध सासरचे भोसले जेव्हा एकमेकांशी  लढून धारातीर्थी पडले. तेव्हा सर्वाधिक दु:ख जिजाऊंना झाले.

आपली माणसे आपल्याच माणसांच्या विरोधात कटकारस्थाने करून वापरली जात आहेत. मराठ्यांचा पराक्रम आणि त्यांच्यातील दुही  हेच यवनांचे  बलस्थान आहे हे त्यांनी ओळखले. त्याच वेळी या लोकांची एकी करून स्वतंत्र मराठा राज्य स्थापन करण्याचे आणि त्याचा राजा होण्याचे स्वप्न त्यांनी शहाजीराजांच्या मनात पेरले. आपला पराक्रम आपल्यासाठी, आपली तलवार यवनांसाठी नव्हे तर मराठी मातीसाठी, गोरगरीब रयतेच्या कल्याणासाठी चालवली पाहीजे हे त्यांनी शहाजीराजांच्या मनात ठसविले. आणि तिथेच स्वतंत्र मराठी राज्य स्थापण्याचे स्फुल्लिंग चेतले.

जिजाऊ आणि शहाजीराजांना सहा अपत्ये झाली. दोन मुले आणि चार मुली. पैकी सर्वात मोठा मुलगा संभाजी आणि सर्वात धाकटे शिवाजीराजे. मधील चारही मुली अल्पायुषी ठरल्या. संभाजी राजांना शहाजी राजांनी आपल्यासोबत बंगळूरच्या जहागिरी वर नेले. जिजाऊ आणि शिवबांना पुणे, सुपेची जहागिरी सोपविली. पतीने आपल्या पत्नीकडे स्वतंत्र जहागिरीचा कारभार सोपविणे हीच अर्थात अलौकिक घटना मानावी लागेल. त्यासाठीचा विश्वास जिजाबाईंनी आपल्या वागण्या बोलण्यातून, व्यवहारातून कमविला होता.

बरं जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी जेव्हा त्या बालशिवाजीसह पुण्यात आल्या तेव्हा पुण्याची अवस्था काय होती? आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने पुणे जाळून बेचिराख करून टाकले होते. येथील जनतेचे जीवन हैराण करून सोडले होते. जनता अन्न पाण्याला महाग झाली होती. कष्टाने पिकवलेला घास मोघलांचा सरदार लुटून नेत असे. परिसरातील बायाबापड्या ही सुरक्षित नव्हत्या.

कुठल्याही मोगली सरदाराची नजर एखाद्या बाईवर गेली तर ती सुरक्षित रहात नसे. त्यांच्या या अत्याचाराला घाबरून लोकं डोंगर कपारीत जाऊन रहात होते. गावेच्या गावे ओस पडली होती. मुरार जगदेवाने तर आपली दहशत बसविण्याची पुण्यात गाढवाचा नांगर फिरवून शेती ओस पाडली होती. अशा पुण्यात येऊन, लोकांना शोधून, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून.

परत येण्याचे आवाहन केले. संरक्षणाची हमी दिली. लोकांनी आपल्या जमिनी कसण्यासाठी उद्युक्त व्हावे. त्यांच्या मनातील भिती दूर व्हावी. आणि पडिक शेते लागवडीखाली यावी यासाठी शिवबांना घेऊन ओसाड जमिनींवर सोन्याचा नांगर फिरवला. केवढा हा धोरणीपणा! ओसाड पुणे पुन्हा वसवले आणि कारभाराला सुरवात केली. एकीकडे शिवबांचे शिक्षण सुरू होते दुसरीकडे जहागिरीचा कारभार सुरू होता. पतीपासून दूर राहून, लहान मुलाला सोबत घेऊन स्वतंत्र कारभार चालविणे ही तेव्हाची क्रांतिकारी घटनाच होती.

शिवाजी राजांच्या शिक्षणात जातीने लक्ष घातले. मुर्तीकार जसा आपल्या मनातले शिल्प घडवताना त्याला आकार देतो, तसे त्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी शिवबांना तयार केले. नितीमत्तेचे पालन करण्याचे संस्कार दिले. स्वाभिमान, स्वातंत्र्य प्रेम, अन्यायाविरुद्धची चीड, न्यायनितीचे पालन, चारित्र्याचे महत्व त्यांनी बाल शिवाजीच्या मनावर कोरले. शिवाजीराजांच्या ठायी असलेले परधर्म सहिष्णुता,स्त्री दाक्षिण्य, रयतेबद्दल असलेले अपार प्रेम, न्यायप्रियता आणि अखंड सावधानता ही जिजाबाईंची शिकवणूक होती.

त्यांनी केवळ शिवबांनाच घडवले असे नाही तर त्याबरोबरच मानवी अविष्कार असलेली नवी मूल्यव्यवस्था  निर्माण केली. स्वराज्य निर्मितीच्या प्रत्येक लढाईत त्या शिवाजी राजांसोबत ठामपणे उभ्या राहिल्या. अफजलखानाशी लढाई असो, पुरंदर चा तह असो किंवा शिवाजी राजे औरंगजेबास भेटण्यासाठी आग्रा येथे गेल्यानंतर कैदेत अडकून पडणे असो. कोणत्याही प्रसंगात घाबरून, खचून न जाता त्यांनी स्वराज्याचा कारभार अत्यंत चोख आणि शिस्तबद्धपणे चालविला.

शहाजीराजांच्या मृत्यू नंतर सती जाण्यासाठी झालेली सिध्दता आपल्या पुत्राच्या आग्रहावरून बाजूला सारली. एतद्देशीय धर्माच्या विद्वानांनी नाकारलेला राज्याभिषेक परप्रांतातून पंडित बोलावून करवून घेतला.शिवबांचे वेगवेगळ्या घराण्यांशी सोयरीक जुळवून स्वराज्य उभारण्याच्या कामात या घराण्यांची मदत मिळवणे असे अत्यंत धाडसी, धोरणी, मुत्सद्दी निर्णय जिजाऊंनी आपल्या आयुष्यात घेतलेले दिसतात.

केवळ वीर पत्नी, वीर माताच नव्हे तर स्वतंत्र व्यक्तीमत्वाची, स्वतंत्र विचारांची बुद्धीवादी स्त्री असे जिजाऊंचे वर्णन करावयास हवे. त्यांच्या समकालीन कवी जयराम पिंडे यांनी आपल्या ‘राधा माधव विलास चंपू’ या शहाजीराजांवर लिहीलेल्या काव्य ग्रंथात जिजाऊंचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘ जशी चंपकेशी खुले फुलजाई, भली शोभली ज्यास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबु  जंबुव्दिपाला, करी साऊली माउलीसी  मुलाला’ याचा अर्थ जिजाई ही शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरूषाला साजण्यासारखी बायको होतीच.

पण केवळ नवऱ्याच्या किर्ती वर नव्हे, तर स्वतः च्या उदार आणि गंभीर वृत्तीने तिची किर्ती त्याकाळी भारतखंडभर पसरली होती. एवढेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या चंबुखाली  सर्व जंबुव्दिप आश्रयासाठी येत असत.

6 जून 1674 ला रायगडावर  शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा जिजाऊंनी कृतार्थ भावनेने अनुभवला. परंतु त्याच्या 12दिवसांनीच म्हणजे 17जून1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे त्यांची प्राणज्योत मालवली. चारशे वर्षानंतरही जिच्या जयजयकाराने तरुणाईच्या मनात वीरश्रीचे स्फुल्लिंग चेतविले जाते अशा क्रांत्यदर्शीला जयंतीनिमित्त विनम्र वंदन.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment