पश्चिम महाराष्ट्र

बारामतीत दहशत माजवणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

बारामती – बारामती शहरात शनिवारी (दि. १७) सायंकाळी तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. यापैकी पाच जणांना पोलिसांनी तात्काळा ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी दिली. आरोपींवर तीन दरोड्याचे व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

अनिश सुरेश जाधव (वय २० वर्ष रा. प्रगती नगर बारामती) व पियुष मंगेश भोसले (वय १९ वर्ष राहणार पवार बंगला आमराई बारामती ), एक अल्पवयीन मुलगा, चिराग गुप्ता ,प्रथमेश मोहरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चेतन कांबळे, विशाल माने, शामवेल उर्फ गोट्या जाधव हे त्या ठिकाणावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान एमआयडीसी भागात कामाला बारमध्ये तोडफोड करून आरोपी चेतन कांबळे ,विशाल माने, चिराग गुप्ता, प्रथमेश मोहरे, एक अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालक यांनी आपला मोर्चा श्रॉफ पेट्रोल पंपाकडे पाटस रोडला वळवला. त्या ठिकाणी वरील सहा जणांनी दोन मोटरसायकल मध्ये दोन हजार रुपयांचे पेट्रोल टाकले त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या विक्रम पवार या कामगारांनी त्यांना पैसे मागितले असता ते पैसे न देता त्याच्यावर कोयता व तलवारी वार करू लागले. त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी थांबलेले गणेश चांदगुडे यांनी त्यांना समज दिली. मात्र आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. त्यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले.

त्यानंतर सदरचे टोळके टीसी कॉलेज परिसरात गेले. येथे फियार्दी सुहास वरुडे यांच्या पॉर्नस्नॅक सेंटर. कॅफेमध्ये तोडफोड केली व या कॅफेतील कामगार अमरीश राम लखन चौधरी याच्या मानेवर जीवे मारण्यासाठी वार केला. मात्र माने यांनी वार चुकवत असताना त्याच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. तसेच आपले रेस्टॉरंट व पॉकेट कॅफे हॉटेलमध्ये सुद्धा तोडफोड केली व समोर उभे असलेल्या दोन चार चाकी गाड्यांचा चक्काचुर केला. तोडफोडीत हॉटेल व गाड्यांचे मिळून अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. आरोपींनी गल्ल्यातील ४ हजार २०० रुपये चोरून नेले. सदरच्या आरोपींच्या मागावर तात्काळ बारामती शहर पोलिसांचे पथके लागली शहरांमध्ये त्यांनी नशेमध्ये परत काही अनुचित प्रकार करू नये म्हणून संपूर्ण शहरात पेट्रोलिंग अलर्ट करण्यात आली. या सर्व आरोपींवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुद्धा दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment