बाळला पोलिओ अन वेदना दीदींना
कोल्हापुरातील मंगळवार पेठेत खरी कॉर्नरला आनंदराव मेस्त्री यांच्या घराशेजारील एक घर लतादीदींनी 15 रूपये महिना भाडय़ाने घेतलं.
आशा, उषा, मीना , हृदयनाथ आणि माईंसोबत लतादीदींनी कोल्हापुरात बिरहाड थाटलं. रोज सायकलने त्या मास्टर विनायक यांच्या शालीनी स्टुडिओमधील कंपनीत कामासाठी जायच्या.
खरंतर पगार इतका तोकडा होता की 15 रूपये भाडे देतानाही खूप कसरत करावी लागायची.
मीना, आशा व उषा यांनी विदयापीठ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला तर हृदयनाथांचे वय अजून शाळेत जाण्याचे नव्हते शिवाय त्यांना पोलिओ झाल्याने सतत त्यांच्या पायातून पू येत असते. गल्लीत मुलं तेव्हा लपंडाव खेळायची. त्या खेळात हृदयनाथ सगळय़ात आधी सापडायचे.
ते कुठे लपून बसलेत हे कळायला वेळ का लागायचा नाही याचे कारण जेव्हा इतर मुलांकडून लतादीदींना समजले तेव्हा आपण बाळ म्हणजे हृदयनाथावर उपचारही करू शकत नाही याची खूप मोठे दु:ख लतादीदींना झाले होते.
खेळणारी मुलं दीदींना म्हणाली, बाळच्या पोलिओ झालेल्या पायातून वाहणारा पू जिथेपर्यंत जमीनीवर सांडत जातो ना, आम्ही तिथे बाळचा माग काढतो आणि बाळ कुठे लपलाय हे आम्हाला लगेच कळतं.
बाळच्या पायातील पू, त्याचा पोलिओ, औषधोपचारालाही पैसे नसल्याचे शल्य याचा फार मोठा परिणाम लतादीदींच्या मनावर झाला.