अजूनही कोरले आहेत ते आघाताचे व्रण
लता मंगेशकर हे नाव आज भारतीय संगीतक्षेत्रात मैलाचा दगड आहे. असा आवाज होणे नाही असं म्हणत लतादीदींनी संगीतविश्वात गारूड केलं आहे.
आजवरच्या या यशस्वी प्रवासात मात्र लतादीदींना अनेक चढउतार, खाचखळगे, अपमान झेलावे लागले आहेत. दीदानाथ मंगेशकर यांच्यारूपाने असलेला वडिलांचा आधार गेल्यानंतर भावंडातील मोठय़ा म्हणून लतादीदींनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांदय़ावर घेतली पण तेच खांदे मजबूत ठेवण्यासाठी दीदींनी त्यांच्या लहानपणातील अनेक कोवळे क्षण लोकांच्या बोलण्याने झालेल्या आघातांनी पचवले आहेत.
खरंतर माणुसकी, भूतदया, संवेदनशीलता या संस्कारातच मंगेशकर कुटुंबात दीदींच्या वयाची बारा वर्षे सुखात गेली. पण जेव्हा बाबा गेले आणि घर चालवण्यासाठी दीदी समाज नावाच्या जगात वावरायला लागल्या तेव्हा व्यवहाराची भाषा, नियमांचे बोल सांगून अनेकांनी दीदींना मानसिक त्रास दिला.
पण कष्टाची तयारी, परिस्थितीची जाणीव आणि आईवडीलांचे संस्कार यामुळे त्यांनी बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतीतूनच उत्तर दिले.
लतादीदी जेव्हा लहानपणातील मनावर व्रणासारख्या कोरलेल्या घटना सांगायच्या तेव्हा लतादीदीनी संघर्षवाट तुडवत गाठलेले यश खूप काही बोलायचे.
….आणि दुधाचा पूर आटला
पंडीत दीनानाथ मंगेशकर जोपर्यंत हयात होते तोपर्यंत मंगेशकर कुटुंबाने अत्यंत सधन दिवस पाहिले. खायला प्यायला काहीही हयगय नव्हती.
नाटकांच्या दौरयाच्या निमित्ताने ज्या शहरात पंडित दीनानाथ कुटुंबासमवेत जायचे त्या शहरातील सगळय़ा चवीरवींचे पदार्थ ते मुलांना आणि माईंना खिलवत असत. लतादीदीपासून हृदयनाथ यांच्यापर्यंत प्रत्येक भावंडांमध्ये दोन वर्षाचे अंतर असल्याने सगळीच अगदी पाठोपाठची.
पाच मुलं, बाबा आणि माई अशी घरात सात माणसे होती पण दीदींच्या बाबांनी रोजचा दहा लिटर दुधाचा रतीब लावला होता. जेवताना कुंडा भरून दूध माईंनी सगळया मुलांना ताटात वाढायचेच असा बाबांचा दंडकच होता. अध्येमध्ये भूक लागली तरी मुल ग्लासभर दूधच प्यायची.
कधीकधी जेवताना वाटीत दूध उरायचे तेव्हा दीदींनी एकदा त्या वाटीतल्या दुधाने हात धुतला तेव्हा माई दीदींना ओरडल्या आणि म्हणाल्या अगं दूध पिऊन टाक असं हात धुवून वाया नको घालवू. तेव्हा बाबा माईंना म्हणाले होते की माझी लता राणी आहे.
दुधातुपाची तिच्या आयुष्यात मी कधीच कमी पडू देणार नाही. तेव्हा दीदींनी बाबांना कडकडून मिठी मारली. दूध वाया घालवल्याबददल माफी मागितली पण बाबांनी आपल्याला राणी म्हटलेलं त्यांना खूप आवडलं.
लतादीदीच नव्हे तर मीना, उषा, आशा आणि बाळ म्हणजेच हृदयनाथ या प्रत्येक लेकराला काहीच कमी पडू नये यासाठी मास्टर दीनानाथ यांची धडपड सुरू असायची. लतादीदी भावंडात मोठय़ा असल्याने बाबांची ही धडपड त्या जवळून पाहत आणि त्याविषयी प्रच्ंड जाणीव व आदर दीदींच्या मनात होता.
बाबा गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस मंगेशकर भावंडे आणि आई माई हे कुटुंब सांगलीमध्ये वास्तव्य़ास होते.
पण कोल्हापुरात हाताला काम मिळण्याच्या संधी अधिक असल्याने आणि मास्टर विनायक यांच्याकडून त्यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये नोकरीचा प्रस्ताव असल्याने लतादीदींनी कुटुंबासोबत कोल्हापूर गाठले. त्यावेळी दीदींचे वय होते 15 वर्षे.
मास्टर विनायक यांच्याकडे काम सुरू केले.