कोल्हापूर – जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण व नागरी भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत व ते प्रश्न सुप्रशासन राबवून अधिक गतीने सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा प्रमुख मार्गदर्शक ए. टी. कुंभार यांनी केले.
केंद्रीय प्रशासकीय सुधार विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिनांक १९ ते २५ डिसेंबर २०२२ हा कालावधी सुप्रशासन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे, त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित कार्यशाळेत कुंभार मार्गदर्शन करत होते. यावेळी प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, महावितरणचे अक्षीक्षक अभियंता अंकुर कावळे, उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, बाबासाहेब वाघमोडे, विकास खरात, अमित माळी, सुशांत बनसोडे, शक्ती कदम, विवेक काळे, वसुंधरा बर्वे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कुंभार पुढे म्हणाले की, सध्याचे प्रशासन चांगले काम करत आहे. तरीही प्रशासकीय यंत्रणेने ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचून शेवटच्या घटकातील सामान्य लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत व ते प्रश्न सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करुन शेवटच्या घटकातील लोकांपर्यंत सुशासनाचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुप्रशासन सप्ताह निमित्त त्यांच्या विभागांतर्गत प्रलंबित असलेले प्रश्न जागेवर जाऊन सोडवण्याचे प्रयत्न करावेत. लोकांना शासकीय योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळेल यासाठी नियोजनबद्ध कार्यपद्धती राबवावी. तसेच अशा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न अधिक गतीने सोडवून त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
प्रारंभी महावितरण, जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा परिषद व कौशल्य विकास विभागाने त्यांच्या विभागाअंतर्गत कशा पद्धतीने सुप्रशासन राबवून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला, याबाबतची सविस्तर माहिती त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यशाळेत सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक तहसीलदार रंजना बिचकर यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी मानले.