कोल्हापूर – केंद्र व राज्यपुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘अमृत महाआवास अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात सन 2020-21 मधील दुसर्या टप्प्यात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यपुरस्कृत सर्व आवास योजनांमध्ये विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट काम करणार्या तालुक्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये गगनबावडा तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आजरा, गडहिंग्लज व शाहूवाडी यांनी द्वितीय, तर राधानगरी तालुक्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने या निवडी केल्या आहेत. वरील पुरस्कारांचे वितरण पुणे विभागीय आयुक्तांच्या हस्ते बुधवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे येथे होणार आहे. याच दिवशी अमृत महाआवास अभियान 2022-23 विभागस्तरीय कार्यशाळा आयोजित केली आहे. पुरस्कार जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक; तर तालुका पातळीवरील पुरस्कार गटविकास अधिकारी स्वीकारणार आहेत.