अर्थकारण महाराष्ट्र

रायगडात महाकार्गो नॉट “गो”,


एसटी कर्मचारी संपाचा मालवाहतूकीलाही फटका, कार्गोचे एसटी ट्रक आगारात उभेच,
जिल्हयात कार्गो बंदीमुळे लाखोंचे उत्पन्न बुडीत

रायगड : रविंद्र कान्हेकर

मतदान पेट्या असो, की अन्य काही महत्वाची प्रवासाची बाब असो महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी म्हणजेच सर्वांची लाडकी लालपरी कायम दिमतीला हजर झाली आहे. तर कोरोना काळात सगळं ठप्प असताना मालवाहतूक करण्यासाठी महामंडळाची कार्गो सेवा धावू लागली. आणि व्यापाऱ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर मात्र आज ४४ दिवस उलटूनही ही सेवा जिल्ह्यात बंद आहे. एसटीचे पुरेसे कर्मचारी अजून हजर झाले नसल्याने ही सेवा सुरू करता आलेली नाही. रायगडात महाकार्गो नॉट गो असल्याने एसटी महामंडळाच्या रायगड विभागाला कोरोना काळात ठरणाऱ्या सेवेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. मोठे संकट बनून आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला लॉकडाऊनच्या खाईत लोटले. लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी, जिल्हाबंदी असे अनेक निर्बंध शासनाकडून लावण्यात आले होते. अनेक व्यवसाय यात बंद होते. नागरिक घरात असल्याने तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे व बस सेवा बंद करण्यात आली होती. 

या काळात एसटी बंद असल्याने महामंडळ देखील आर्थिक संकटात सापडले होते. याआर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढवण्याकरिता एसटी महामंडळाने १ मे २०२० रोजी मालवाहतूकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. प्रवासी गाड्यांमध्ये काही अंशतः बदल करून माल वाहतुकीसाठी वाहन तयार करण्यात आले होते. सध्या महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरात १ हजार १५० एसटीचे मालवाहतूक ट्रक आहेत. तर रायगड जिल्ह्यात ४२ ट्रक आहेत. ही सेवा सुरू होताच जिल्ह्यात एसटीच्या कार्गोचे ट्रक जोमाने धावू लागले. एसटीच्या मालवाहतुक ट्रकांचे ब्रॅण्डिंग करण्याचा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी घेतला. 

त्यासाठी मालवाहतूक सेवेचे ‘महाकार्गो’ असे नामकरण हि करण्यात आले. ही सेवा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात रायगड कार्गो सेवेत अव्वल स्थानावर होता. रायगड मधील महाकार्गोचे ट्रक महाराष्ट्रभर धावत होते. महाकार्गो ही सेवा ग्राहकांसाठी किफायतशीर ठरत होती. तर जिल्ह्यात असलेल्या या सेवेतून दिवसाला साधारण 100 किलोमीटर ट्रक चालत होते. तर 60 रुपये प्रति किलोमीटर उत्पन्न मिळत होते. 

हे उत्पन्न प्रवासीच्या गाडीच्या जवळपास दुप्पट होते. महामंडळाच्या प्रवासी बस मध्ये साधारण ३२ ते ३५ च्या दरम्यान हे उत्पन्न असते. मात्र ८ नोव्हेंबर रोजी एसटीच्या विलीनीकरणाचा प्रश्न घेऊन कर्मचारी आक्रमक झाले. आणि त्यांच्याकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला. परिणामी एसटीचा चक्का जाम झाला तर आंदोलनाच्या फेऱ्यात महामंडळाची महत्वाची महाकार्गो सेवा देखील रुतून पडली ती अद्याप सुरू होण्याची अजिबात चिन्हे नाहीत. 

कोरोना काळात महामंडळाची एसटी बस सेवा देखील बंद होती. त्याकाळात महामंडळापुढे असलेला आर्थिक तोट्याचा पेच सोडवण्यासाठी महाकार्गो ने महत्वाची भूमिका बजावली होती. आर्थिक तोट्यातून एसटी महामंडळाला याच कार्गोने बाहेर तारले होते. हि सेवा सुरु झाल्यापासून जिल्ह्यात साधारण या सेवेतून महामंडळाच्या रायगड विभागाला तब्बल ३ कोटी रुपयांचा फायदा झाला होता. 

मात्र सध्या वाहक व चालक कमी प्रमाणात कामावर हजर झाले असल्याने प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र महामंडळाची प्रवासी वाहतूक देखील तुरळक पद्धतीने सुरु आहे. तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महाकार्गो धुळीच्या फेऱ्यात अडकली आहे.  त्यामुळे एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तर महामंडळाचे रायगड विभागातील महाकार्गोचे ट्रक पनवेल, पेण, कर्जत, महाड, अलिबाग अशा आगारात धूळ खात उभे आहेत.

प्रवाशांना एसटी बस कायम सोयीची ठरली आहे. त्यात कोरोना काळात देखील आपल्या राज्यात प्रवाशांना घेऊन जाण्यास लोकांसाठी एसटीच धावून आली होती. महामंडळाकडून सूर करण्यात आलेली महाकार्गो सेवा देखील व्यापारी वर्गासाठी वरदान ठरली होती.

तर महामंडळाला देखील महाकार्गोने तारले अशात सध्या हि सेवा बंद असल्याने व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर हि सेवा देण्यास कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महामंडळ देखील असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण, माणगाव, अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, कर्जत, महाड या आठ आगारात एकूण १८४१ कर्मचारी कार्यरत असून यामध्ये ५०३ वाहक,४९३ चालक, वर्ग दोनचे १९ अधिकारी व ८०६ प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी हे संपात सामील झाले होते. त्यापैकी आता ७५० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. हजर झालेल्यांपैकी वाहक व चालक यांची संख्या कमी आहे.

प्रतिक्रिया:
रायगड जिल्ह्यात संपानंतर साधारण 750 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र त्यात बहुतांश कार्यालयीन कर्मचारी असून वाहक, चालक यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आम्ही प्रवासी वाहतुकीला अगोदर प्राधान्य दिलं आहे. परिणामी कार्गो सेवा बंद आहे.
: अनघा बारटक्के,
विभाग नियंत्रक रायगड, परिवहन महामंडळ

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment