एकेकाळी सुरतेची लूट करून आपल्या मावळ्यांना आपला अधिकार मिळवून देणाऱ्या राजे शिवबांच्या राज्यातील, तथाकथित स्वतःला महाराजांचे शिलेदार म्हणवणाऱ्यानी आपली तोंडे लपवण्यासाठी त्याच सुरतेचा सहारा घेतला. ह्यापेक्षा आणखी काय शोकांतिका असावी.
रोहन सुनंदा भेंडे
“एकनाथ शिंदे मध्यरात्री काही आमदारांना घेऊन सुरत मध्ये एका आलिशान हॉटेल मध्ये पोहचलेत”
बातमी आली आणि राजकीय वर्तुळात हाहाकार मजला.
ह्याची आशंका राजकीय पंडितांना होतीच. पहाटे ७ वाजता राजभवनात जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस राज्यात सत्ता पुनः कशी मिळेल ह्यासाठी अगदी प्रयत्नवत होतेच, हे काही कुणाकडून लपलेले नाहीच. आणि सोबतीला केंद्रीय संस्था, सिबीआय, ईडी, इन्कमटॅक्स अश्या सरकारी आणि आता सर्रास राजकीय हेतूने वापरल्या जाणाऱ्या संस्था असेल तर मग सोन्याहून पिवळे.
इथे हा विषय मुळातच अलाहिदा आहे. प्रश्न हा अजिबात नाही कि भाजपा ने काय खेळी केली, किंवा हॉटेल बुकिंग पासून खासगी विमान उपलब्ध करण्यास कुणाचे पैसे खर्च झालेत.
प्रश्न आहे तो एका पक्षाचा, संघटनेचा, तिच्या विचारांचा, तिने लढून स्वतःला उभे करण्यात केलेल्या संघर्षाचा.

ह्या घडामोडीत काल नेमक्या दोन महत्वाच्या घटना घडल्यात.
पहिली म्हणजे एकनाथ शिंदे ह्यांचा कडे २/३ संख्याबळ पूर्णपणे असल्याचे त्यांचे पत्र विधिमंडळ अध्यक्षांच्या नावाने त्यांनी दिले.
आणि दुसरी म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी राज्याला संबोधन करून आपले मुख्यमंत्री आवास त्यागात मातोश्री ला मुक्काम हलवला.
एक सामान्य मतदार म्हणून ह्या घोडेबाजाराचा अर्थ काय होतो, आणि नैतिकतेची ढोल बडवणारी किती अनैतिक असतात ह्याला दाखवणारे जळजळीत उदाहरण म्हणजे सध्याचा राजकीय उलथापालथीचा घाट.
समजा , शिंदे म्हणत असतील ते सर्व जरी ग्राह्य धरले तरी, मूळ प्रश्न तिथेच अडकून आहे. परस्परविरुद्ध भूमिका आणि विचारसरणी असलेली पक्ष जेव्हा सत्तेसाठी एकत्र आली, तेव्हा एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार त्या सत्तेत भागीदार का झालेत. त्या वेळी हि टोकाची भूमिका घेण्यास त्यांना नेमके कुणी बरे अडवले होते.
लग्न आटोपून मधुचंद्राच्या रात्रीची सुख उपभोगायचे, सकाळी उठून मलईदार जेवण ओरपायचे आणि सांच्याला काडीमोडाची भाषा करताना आम्ही कसे फसवले गेलो हा उर बडवत जायचा. अश्यातला सर्व हा प्रकार.
बर निवडणुकीत भाजपा सॊबत भागीदारीने निवडणूक लढवून, आपल्याला मुख्यमंत्री पद भेटण्याची चिन्ह न दिसल्यावर सेनेनं हा घाट घातला होता. त्यावेळी हिंदुत्व आणि तत्सम बेगडी उदाहरणे कुठे गेली होती. कि दोन पाच मंत्रिपदासाठी आम्ही भिक्षुक हि भूमिका घेण्याची लाज ह्या नेत्यांना वाटली नाही का?
उद्धव ठाकरे ह्यांनी कालच्या आपल्या संभाषणात “मी मुख्यमंत्री पद सोडतोय, दुसरा कोण शिवसैनिक मुखमंत्री बनत असेल तरी मला काही अडचण नाही ” हे वाक्य हुकुमी असल्यासारखं टाकलं. आणि शिंदे ह्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
धर्मवीर आनंद दिघे ह्यांचा कळपातील हि शिंदे आणि तत्सम बछडी. आज हिंदू आणि हिंदुत्वाचा जो काय ढालसारखा वापर करताय त्याचा धर्मवीरांनी तरी पाठपुरावा केला असता का हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
आणि ह्यासाठी आपणास शिवसेनेची स्थापना, सेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि सर्वात महत्वाचे हि शिवसेना उभे करणारे तमाम ते महाराष्ट्रातील सेनेचे कार्यकर्ते, ह्यांचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे.
ह्याचे कारण सेनेचा जन्म महाराष्ट्रातील लाचार म्हणून जगणाऱ्या सामान्य माणसांच्या अधिकारासाठी लढा देणारी संघटना म्हणून झाला होता. त्या सेनेच्या शिलेदारांनी आपल्या महत्वाकांक्षेपायी त्या तमाम कार्यकर्त्यांना शेंदूर लावून बोटचेपेपपणाची भूमिका घ्यावी. हि गोष्ट त्या प्रामाणिक शिवसैनिकांना लाज आणून देणारी आहे.
इतका घाट एकनाथ शिंदे ह्यांनी घातला त्यात त्यांना काय साध्य होणार?, इथून उद्धव ठाकरे ह्यांचे अस्तित्व संपणार का? इथपर्यंत अनेक चर्चा सुरु जरी असल्या, तरी आतून कुणी किती पैश्यापायी आपला स्वाभिमान विकलं हे पाहायला हवे.
ह्या सर्व ह्यातून काही प्रश्न उद्भवतात, तेही फार महत्वाचे आहेत.
हॉटेल मध्ये जाऊन लपून बसण्याचा आणि तिथून असले मोठे मोठे डाव रचनार्याना लोकप्रतिनिधी का म्हणावेत?
निष्ठावान कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांवर प्रेम करणाऱ्या मतदारांच्या जीवावर निवडून येणाऱ्या नेत्यांना त्याच प्रदेशात राहून आपल्या अधिकारासाठी आवाज उठवता येत नाही का ?
दुसऱ्या राज्यात पळून जाऊन, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमाची किती अवहेलना ह्या नेत्यांना करावयाची आहे?

म्हणे काय तर आम्ही हिंदुत्व टिकवण्यासाठी हे सर्व करतोय.
महाराजांच्या सावलीत उभ्या राज्याचा मेरू चौफेर विजयी होण्यासाठी, महाराजांनी आपल्या मावळ्यांचा सोबत राहून, आपल्या मातृभूमीसोबत कोणता दगाफटका न करता झुंज देऊन हे राज्य उभं केलंय .
त्यांची वारस सांगणारी त्यांची औलाद अशी पळपुटा आणि स्वतःचे घर भेदणारी निघाल्यावर देवच ह्या राज्याला वाली असेल असं म्हणावं लागेल.
उद्या सत्ताबदल झाला, आणि कुणी हि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तरी चार छदांमासाठी आणि पदासाठी विकले गेलेल्या ह्या तथाकथित नेत्यांना मतदारांनी धडा शिकवणे गरजेचे असेल. अन्यथा अफजलखानाच्या वधाचा सापडा रचताना आपल्याच शिलेदारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याची घटना हा महाराष्ट्र वारंवार पाहत राहील .
भगवी पताका हातात घेऊन यवनांचा कर्दनकाळ होत हिंदू धर्माची पालखी वाहणाऱ्या राजे शिवबांच्या राज्यातला तथाकथित “हिंदू धर्माच्या ” रक्षणासाठीचा हा बेगडा प्रयत्न हिंदुत्व लाचार झालाय का ? ह्या प्रश्नाशी आणून सोडतो, इतकेच …