सांगली – महाराष्ट्र शासनाने चालविलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण आणि वातावरणीय बदल स्पर्धेत सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेने अमृत गटात दुसरा क्रमांक पटकावला होता. मात्र, या स्पर्धेबाबत जिंकलेल्या रकमेची घोषणा करण्यात आली नव्हती. आता या बक्षिसाची घोषणा झाली असून, सांगली महानगरपालिकेला ७ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४०६ नागरी स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत राबवण्यात आली होती. पण, दुसरे स्थान मिळवूनही सांगली महानगरपालिकेला बक्षीस जाहीर करण्यात आले नव्हते. सात महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांना बक्षीस जाहीर झाले असून, याबद्दलची माहिती शासनाच्या परिपत्रकातून आली. आता या बक्षिसाच्या रकमेतून निसर्गाचे संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्याचे उपक्रम हाती घेतले जातील.
त्यासाठी मनपा क्षेत्रात वृक्षरोपण, अमृतवने, स्मृतिवने, शहरीवने, बटरफ्लाय बगीचे, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित वनांचे संवर्धन, जलसंवर्धनाची उपक्रम आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्या संबंधीची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, सभागृहनेत्या भारती दिगडे यांनी दिली. यावेळी उपयुक्त राहुल रोकडे, समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक योगेंद्र थोरात आदी उपस्थित होते.