पश्चिम महाराष्ट्र

मनसेचा पठ्ठया अखेर शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांनी सोपवली मोठी जबाबदारी

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पदाधिकारी निलेश माझिरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर माझिरे यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माझिरे यांच्यावर माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निलेश माझिरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर माझिरे यांनी आपल्या ४०० कार्यकर्त्यांसह मनसेला जय महाराष्ट्र केला होता. मनसेच्या शहर कोअर कमिटीवर आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांच्यावर गंभीर आरोप करत माझिरे यांनी पक्ष सोडला होता, त्यानंतर ‘बाबू वागस्कर हटाव मनसे बचाव’ अशी मोहीम देखील माझिरेच्या समर्थनार्थ सुरु झाली होती.

वसंत मोरेंशी बिनसलं
निलेश माझिरे यांना मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ते शहराध्यक्ष पक्षात प्रवेश दिला होता. तेव्हापासून माझिरे हे मोरेंचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा आणि आमचा संबंध संपला अशी थेट भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. तर दुसरीकडे मला देखील वसंत मोरेंची गरज नसल्याचं प्रत्युत्तर माझिरे यांनी दिले होते. माझिरे यांच्या जाण्याने मनसेला पुण्यात आता मोठा फटका बसण्याचे चिन्ह आहेत.

वसंत मोरेंचा समर्थक असल्यानेच पक्षातून साईडलाईन
वसंत मोरे यांचे खंदे समर्थक असल्यानेच आपल्याला बाजूला सारत असल्याचा आरोप माझिरे यांनी केला होता. वसंत मोरे आणि मनसे पुणे शहर कोअर कमिटी यांच्यातील वाद काही झाकून राहिलेले नाहीत. अशात आपण मोरे समर्थक असल्यानेच कोअर कमिटीने आपल्याला बाजूला केल्याचा गंभीर आरोप माझिरे यांनी केला होता.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment