पश्चिम महाराष्ट्र

युवा पिढीला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी उपाययोजना राबवणार

कोल्हापूर – दि.२२(जिमाका): जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करुन अंमली पदार्थ विरोधी समितीने यासाठी व्यापक मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केल्या.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी समित्यांनी प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत, असे सांगून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, सध्या तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करा. गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन ते म्हणाले, व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या आणि त्यांना असणाऱ्या व्यसनाधीनतेविषयीची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाऱ्या कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होवू शकते, अशा परिसरावर विशेष लक्ष देवून अवैध कृती आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, अशा त्यांनी यावेळी सूचना पोलीस विभागाला केल्या.

व्यापक जनजागृतीवर भर- अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून बसस्थानक, रेल्वेस्थानक, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या आवारात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येईल. समुपदेशन केंद्रासाठी प्रयत्न- अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या युवक, व्यक्तींना समुपदेशन करुन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री होताना आढळल्यास माहिती द्या
जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ८४११८४९९२२ व ०२३१ – २६६२३३३ या क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावी. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment