देश-विदेश महाराष्ट्र

कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गासह इतर मागण्यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

नवी दिल्ली – राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीमध्ये रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेतली. कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुपरीकरण यासह प्रवाशांच्या हिताच्या आणि जिव्हाळ्याच्या मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या सादर केल्या.

गेल्या काही वर्षांपासून रेल्वेबाबतच्या प्रलंबित मागण्या, खासदार महाडिक यांनी पुन्हा रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. कोल्हापूर हे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वेस्थानक असून, दळणवळणासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोरोना काळानंतर सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाली असून, प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. अशावेळी २५ वर्षांपासून सुरू असलेली सन्ह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी. महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडीचे डबे जुने आणि कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सर्व डबे नवे आणि अत्याधुनिक स्वरूपात आणावेत, वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे.

पूर्वी कोल्हापूर ते बेंगलोर या मार्गावर धावणारी राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, कोरोना काळानंतर सध्या मिरजेतून सुटत आहे. मात्र ही गाडीसुद्धा पूर्ववत कोल्हापूरमधून सुटावी, अशी विनंती खा. महाडिक यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. तर कोल्हापूर ते अहमदाबाद या मार्गावरील रेल्वे सध्या अाठवड्यातून एकदा धावते. ती  आठवड्यातून किमान तीनदा करावी. तसेच कोल्हापूर ते मिरज या ४८ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करावे, अशा मागण्या खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या आहेत. खासदार महाडिक यांच्या या सर्व मागण्यांबाबत रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोल्हापूरकरांच्या मागण्यांना लवकरच न्याय मिळेल, याची खात्री वाटत असल्याचे खासदार महाडिक यांनी म्हंटले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment