विरार – अर्नाळा समुद्रकिनारी अचानक समुद्रातील मासे उड्या मारत समुद्र किनाऱ्यावर आल्याचे एक अनोखे दृश्य पहावयास मिळाले. समुद्रकिनारी आलेल्या या माश्यांना पकडण्यासाठी देखील नागरिकांनी एकच गर्दी केली. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
विरारच्या पश्चिमेला असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास लाखो मासे समुद्राच्या पाण्यात उड्या मारत समुद्र किनारी आल्याचे एक अद्भुत चित्र पहावयास मिळाले. त्यानंतर या ठिकाणी मच्छिमार व नागरिकांनी एकच गर्दी केली. मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊन मासे पकडण्यासाठी अत्यंत कसरत करावी लागते. मात्र हे मासे अगदी हाताजवळ अशाप्रकारे आल्याने आसपासच्या नागरिक व मच्छीमारांनी पोत, टोपली, पिशवी आपल्या हाती जे काही येईल ते घेऊन हे मासे पकडण्यासाठी धावा घेत होते.
स्थानिक कोळी भाषेत या माशांना वनगरी जातीचा मासा, त्याचप्रमाणे तारली असे देखील म्हणतात. समुद्राच्या किनारी भागात जाळीने मासेमारी पकडताना हा मासा आढळतो. अचानक हे मासे लाखोंच्या संख्येने समुद्रातून अशा पद्धतीने मोठ्या संख्येने समुद्रकिनारी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
हे मासे कुठून व कसे आले ? किंवा हा प्रकार नेमका काय आहे याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. मात्र समुद्र किनाऱ्याला आलेले आयते मासे पकडण्यासाठी याठिकाणी मच्छिमार व नागरिकांची झुंबड उडाली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून समाज माध्यमांमध्ये देखील व्हायरल होत आहे.