रत्नागिरी – नाव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पण नावात जरी कोकण असलं तरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर मात्र कोकणाबाहेरील प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. चक्क कोकणाबाहेरील जळगाव व औरंगाबाद येथील बेग नामक व्यक्तीची प्रगतशील शेतकरी हा निकष लावून नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
दोन दिवसांपूर्वी झालेल्या रत्नागिरी येथील मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच कोकणावर असलेल्या प्रेमाचे दाखले देत काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. पण याच शिंदे फडणवीस सरकारमधील कृषीमंत्र्यांनी मात्र कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर कोकणा बाहेरील व्यक्तिची निवड करत कोकणातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना पध्दतशिरपणे डावलले आहे. या सगळ्या प्रकाराबाबत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी कार्यकारी परिषदेवर कोकणातीलच व्यक्तीची निवड करून कोकणाबाहेरील व्यक्तीची निवड रद्द करावी अशी मागणी केली आहे. २०१९ मध्येही असाच प्रकार तत्कालीन कृषिमंत्री डॉ.अनिल भोंडे यांनी तर चक्क कोकणाबाहेरील तीन व्यक्तींची निवड कार्यकारी परिषदेवर केली होती. कोकण विभागातील शेतकऱ्यांचा बागातदारांना सातत्याने सापत्नपणाची वागणूक देत डावलले जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. व येथील कृषी विद्यापीठ कोकणाच्या भागाचे मात्र कार्यकारी परिषदेवर निवड करण्यासाठी प्रगतशील शेतकरीच नाही का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर एकूण चौदा अशासकीय नियुक्त सदस्य असतात. त्या सदस्यांचे निकष व ज्यांच्या आदेशाने नियुक्ती होते ती पुढीलप्रमाणे प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एक- राज्यपाल महोदय,प्रगतिशील शेतकरी पाच -प्रतिकुलपती तथा मंत्री महोदय, कृषी उद्योजक एक- कृषी व पदुम विभाग, विधानसभा सदस्य तीन,विधानपरिषद सदस्य दोन- सभागृह सभापती,विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जिल्हा परिषद मधील कोणत्याही जि. प.मधील कृषी समिती सभापती दोन-प्रतिकुलपती अशा स्वरूपाचे हे निकष आहेत.
महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ मधील कलम ३००) नील तरतूदीनुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर प्रगतिशील शेतकरी या प्रवर्गातून मा. प्रति कुलपति यांनी राजेश गजानन वानखेडे रा. रावेर, जि. जळगाव यांचे नामनिर्देशन केले आहे. त्यानुसार राजेश गजानन वानखेडे राहणार चांदणी चौक रावेर जि.जळगाव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली वा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील ही नेमणूक पुढील आदेश होईपर्यंत पण जास्तीत जास्त तीन वर्षांचा कालावधी यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत असेल असे आदेश कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाकडून ७ डिसेंबर रोजी कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यलयाकडून राजेश गजानन वानखेडे राहणार चांदणी चौक रावेर जि.जळगाव यांच्या कार्यकारी परिषदेवरील नियुक्तीची अधिसूचना काढण्यात आली आहे.
दरम्यान शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील बेग नामक शेतकऱ्याची नियुक्ती कार्यकारी परिषदेवर करावी असे आदेश कृषी मंत्र्यांकडुन देण्यात आलेत त्यामुळे आता कोकणासाठी असलेली अजून एक प्रगतशिल शेतकऱ्याची जागा हिरावून घेण्याची तयारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडुन करण्यात आली आहे.
कृषीमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही ऑर्डर करतो अशी माहिती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.बी. आर. साळवी यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली. कार्यकारी परिषदेवर एकूण चार प्रगतशिल नियुक्ती केली जाते आतापर्यंत प्रगतशील शेतकऱ्यांपैकी दोन जागांवर नियुक्ती झाले आहेत. अशी माहिती कुलसचिव कार्यालयाकडून देण्यात आली हे दोन्हीही शेतकरी कोकणाबाहेरील असल्याच्या वृत्ताला प्रगतशील शेतकऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या पत्त्यावरून दुजोरा मिळाला आहे.