कोंकण महाराष्ट्र

मुंब्र्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची चिन्हे

ठाणे – राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तथा ठाणे महानगर पालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्रा येथे लावण्यात आलेल्या बॅनर मुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाकडून हा बॅनर लावण्यात आला असून चक्का या बॅनरवर शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंब्रा येथे आव्हाडांना शह देण्यासाठी शिंदे सरकारकडून पुन्हा प्रयत्न सुरू आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

सध्या ठाण्यात बॅनरच्या माध्यमातून नवनवीन राजकीय खेळ आणि डावपेच सुरू असलेलं चित्र पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक तथा ठाणे महानगरपालिका गटनेते नजीब मुल्ला यांचा आज वाढदिवस आहे. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तिय मानले जात होते. मात्र आज पहाटे ठाण्यातील मुंब्रा परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेल्या बॅनरवर चक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माजी नगरसेवक राजन केणे यांचे फोटो लावलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि गटनेते नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. बॅनरमध्ये असलेले माजी नगरसेवक राजन केणे यांनी राजकीय आकसापोटी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कट कारस्थान करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर अशा प्रकारचे बॅनर झळकने हे राष्ट्रवादीला झटका देण्यासारखे आहे.

मुंब्रा येथील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिंदे गटाकडून वारंवार काही ना काही खोट्या गुन्ह्यांमध्ये गोत्यात आणण्याचं काम सुरू असल्याचा आरोप नेहमी आव्हाडांनी केला आहे. मात्र आता आव्हाडांना शह देण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला यांचा बॅनर मुंब्रामध्ये शिंदे सरकार सोबत झळकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची चिन्ह दिसून येत आहेत. नजीब मुल्ला हे विधान परिषद आमदारकी साठी इच्छु होते आणि काही वर्षांपूर्वी आव्हाड यांना मात देण्यासाठी अशाच प्रकारचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र आता आव्हाड यांना शह देण्यासाठी नजीब मुल्ला यांना कुठले पद किंवा उमेदवारी देण्यात येणार आहे का? असा संभ्रम देखील उपस्थित होऊ लागला आहे. मात्र आता झळकलेल्या बॅनरमुळे मुंब्रामध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment