मुरबाड – तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा गावच्या जत्रेत यंदा गाय, बैलांचा बाजार भरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लम्पीच्या प्रादुर्भावामुळे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
तब्बल ३५० वर्षांची परंपरा असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा गावात दरवर्षी पौष पौर्णिमेपासून मोठी यात्रा भरते. तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेत गुरांचा बाजार हे मोठं आकर्षण असतं. या बाजारात ठाण्यासह नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमधूनही गुरं खरेदी विक्रीसाठी येत असतात. मात्र यंदा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेत भरणाऱ्या गुरांच्या बाजारात गाय, बैल यांचा समावेश मात्र असणार नाहीये. कोंबड्या, शेळ्या, बकऱ्या यांचा समावेश या गुरांच्या बाजारात असणार आहे. लम्पीमुळे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. लक्ष्मण पवार यांनी दिली आहे.
गुरांच्या बाजारासोबतच शेतीची अवजारं, घोंगडी, टोपल्या, काठ्या, मोठे खलबत्ते अशा ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू या म्हसा जत्रेत विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळेच दरवर्षी या जत्रेला लाखो लोक भेट देतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही जत्रा होऊ शकली नव्हती. यंदा ही जत्रा जरी होणार असली, तरी त्यात प्रमुख आकर्षण असलेला गाय बैलांचा बाजार मात्र भरणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असणार आहे.