धुळे – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्याविरोधात बांधकाम विभागातील सर्व उपअभियंते अधिकारी-कर्मचारी एकवटले आहेत. अपमानास्पद वागणूक देणे, धमकावणे, कॉलर पकडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पुरुष कर्मचारीच नव्हे तर महिला कर्मचाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी टीका-टिप्पणी त्या नेहमीच करतात.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियान वर्षा घूगरी ह्या आपल्या विभागातील महिला कर्मचाऱ्यांना ‘तुमच्या कामापेक्षा वेश्यांचा व्यवसाय चांगला, ते चांगलं काम करतात.’ असे अजब तर्क लढवत खालच्या स्तरावर महिलांशी बोलतात. ‘आमचा प्रत्येकवेळी अपमान केला जातो, यापुढे वर्षा घुगरींची विकृत मनमानी अजिबात सहन केली जाणार नाही’, अशी ठोस भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी आज घेतली.
यासंदर्भात अधिक्षक अभियंता विवेक नवले यांच्या समक्ष तक्रारींचा पाढा वाचून दाखविण्यात आला. घुगरींना सक्तीच्या रजेवर पाठवा, अन्यथा बेमुदत लेखणी आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी या कर्मचाऱ्यांशी विकृत पद्धतीने वागतात. शिवाय, यासंदर्भात बोलायला गेले तर त्या म्हणतात, ‘मुर्खा तुला समजत नाही, तू काय त्याचा चमचा आहे काय?’ अशी हीन भाषा वापरून अपमानीत करतात. तसेच त्यांच्यावर धमकावण्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोणी मला आडवे आले. तर मी स्वतःहून माझे कपडे फाडून घेईल, माझ्याकडे टोचा असतो, लाकडी दांडा व इतर साहित्य असते, मी स्वतःला जखमी करुन घेईल. महिला आयोगात तक्रार करेल.
माझ्या नादी लागायचे नाही, माझी बहिण (सीबीआय) आयपीएस आहे. माझा नवरा महेश घुगरी हा भाजपचा ज्येष्ठ राजकीय पदाधिकारी आहे, आमच्या कुटुंबाचे अनेक केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांशी संबंध आहे माझ्याविरोधात आतापर्यंत तक्रारी करुनही काही वाकडे झालेले नाही. तुम्हाला माझे जे करायचे ते करुन घ्या मी तुम्हा सर्वांना पुरुन उरेल.’ अशी भाषा वर्षा घुगरी यांच्याकडून वापरली जात असल्याचा आरोप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे.