पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना राष्ट्रीय ‘फेलो ऑफ दि सोसायटी’ पुरस्कार

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर शिर्के यांना इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स या संख्याशास्त्रातील राष्ट्रीय आघाडीच्या संस्थेकडून ‘फेलो ऑफ दि सोसायटी’ हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. ‘संख्याशास्त्र आणि वारंवारिता क्षेत्राच्या प्रगती आणि विकासात दिलेल्या लक्षणीय योगदाना’बद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात येत असल्याचे संस्थेच्या प्रमाणपत्रात म्हटले आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपती मुख्यालय असणाऱ्या इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स (आयएसपीएस) आणि कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने कोचीन येथे दि. ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत संस्थेची ४२ वी वार्षिक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना ‘फेलो ऑफ दि सोसायटी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्याचे नियोजन होते. तथापि, या काळात पूर्वनियोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहावयाचे असल्याने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या अनुपस्थितीत पुरस्काराची घोषणा करण्यात आली. नुकतेच डॉ. शिर्के यांना या पुरस्काराचे मानपत्र व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

सोसायटीने प्रदान केलेल्या मानपत्रामध्ये कुलगुरू तथा संख्याशास्त्रज्ञ डॉ. शिर्के यांनी संख्याशास्त्र व वारंवारिता या क्षेत्रांच्या विकासामध्ये गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. “एक प्रख्यात शास्त्रज्ञ, प्रभावी शिक्षक, चिकित्सक संशोधक, गाढे संख्याशास्त्रज्ञ आणि मूल्यनिष्ठ मानवतावादी म्हणून ‘फेलो ऑफ सोसायटी’ हा किताब आपल्याला बहाल करताना सोसायटीला अतिशय अभिमान वाटत आहे,” अशा शब्दांत कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment