विचार

#NDPATIL महाराष्ट्राचा मार्गदर्शक हरपला

#NDPATIL महाराष्ट्राचा मार्गदर्शक हरपला

By: विजय चोरमारे

प्रा. एन. डी. पाटील महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळींमध्ये सात दशकांहून अधिक काळ कार्यरत होते. प्रस्थापित राजकीय पक्षांनी सामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गाला वाऱ्यावर सोडले असताना अशा वर्गाच्या हक्कांसाठी, त्यांना सन्मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. 

सारेच दीप कसे मंदावले आता, असे वाटत असल्याच्या काळात एनडींसारख्या संघर्षसूर्याने अनेकांना लढण्याची प्रेरणा दिली. 

महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे पाईक म्हणून त्यांनी अगदी परवापरवापर्यंत महाराष्ट्राच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा मार्गदर्शक हरपला आहे.

वाळवा तालुक्यातील ढवळी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटंबातले शिकणारे ते पहिलेच. गाव सांगली जिल्ह्यातले असले तरी कोल्हापूरच्या शिवेवरचे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या सुधारणावादी विचारांच्या संस्कारांकडे  त्यांचा ओढा राहिला. 

भाई माधवराव बागल यांच्यासारख्या लढवय्याला पाहात मोठे झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, येडेनिपाणीचे पांडु मास्तर, शिगावचे रंगरावदादा पाटील अशा क्रांतिकारकांचे लढे पाहात अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी सज्ज झाले. 

शिक्षणाची गंगा खेडोपाडी आणि गरिबांच्या झोपडीपर्यंत नेणाऱ्या आधुनिक ऋषी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिसस्पर्श झाला आणि एनडींच्या आयुष्याचे सोने झाले. आष्ट्याच्या शाळेत शिकत असताना रामकृष्ण खैरमोडे मास्तरांनी दिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक त्यांनी जिवापाड जपले आणि त्यापासून प्रेरणा घेऊन  आयुष्यभर  जातीव्यवस्था  उद् ध्वस्त करण्यासाठी  झटत राहिले.  घडणीच्या  काळातली ही संस्कारांची शिदोरी घेऊन ते आयुष्यभर विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लढत राहिले.

एनडी सरांचा  सामाजिक आणि राजकीय प्रवास पाहता एका आयुष्यात अनेक  आयुष्ये जगत  असल्याचा भास होतो. 

विधानपरिषदेत अठरा वर्षे आणि विधानसभेतील पाच वर्षे अशी सुमारे दोन तपांची त्यांची संसदीय कारकीर्द आहे. महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणूनही दोन वर्षे समर्थपणे जबाबदारी पार पाडली आहे. 

शेती आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या विषयांवर सातत्याने बोलत आणि काम करीत  राहिले.  विधिमंडळात काम करताना महाराष्ट्र सरकारच्या‘श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप’ उघड केले. शेतकऱ्यांच्या लुटीचे वर्तमान सांगताना किफायतशीर शेतीची कैफियतही मांडली. कर्मवीरांच्या संस्कारात वाढलेल्या एऩडी सरांना रयत शिक्षण संस्थेचे  चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली,  हा अनेकांसाठी  भाग्ययोग म्हणावा लागेल. 

रयतचे चेअरमन म्हणून काम करतानाच त्यांनी ‘हे शिक्षण नेमके आहे तरी कोणासाठी ?’ या स्वतःच पूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे कृतीतून उत्तर दिले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकारणात कार्यरत राहिले. पक्षातील अनेक धुरिणांनी नंतरच्या काळात काँग्रेसची वाट धरली, परंतु सत्तेचा वारा त्यांना कधी मोहात पाडू शकला नाही. 

एका व्यक्तिने आयुष्यभर – जवळपास साठ वर्षे एकाच पक्षात राहण्याचे देशाच्या राजकारणातील एनडी सरांचे उदाहरण दुर्मिळ म्हणावे लागेल. निष्ठा कशाला म्हणतात, हे त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीतूनच दिसून येते. राजकारणात चारित्र्य हा गुण दुर्मिळ बनला असताना त्यांनी आपल्या अशिक्षित आईच्या शिकवणीनुसार कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही. गेल्या अडीच-तीन दशकांत त्यांच्या शेतकरी कामगार पक्षाला किंवा इतर डाव्या पुरोगामी पक्षांना संसदीय राजकारणात फारसे संख्याबळ लाभले नाही, पण म्हणून त्यांनी हिंमत सोडली नाही. 

लोकहिताच्या लढाया जशा विधिमंडळात लढल्या जातात तशाच त्या रस्त्यावरही प्रभावीपणे लढता येतात, हे एनडी सरांनी आणि त्यांचे जिवलग स्नेही दिवंगत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी दाखवून दिले. 

एन्रॉन प्रकल्पाविरोधातील लढा, रायगड जिल्ह्यातील सेझ विरोधातील लढा आणि कोल्हापूर शहरातील टोलविरोधी लढा ही त्याची काही प्रातिनिधिक जिवंत उदाहरणे. कोणत्याही आंदोलनात संख्याबळापेक्षा नेतृत्वाच्या नैतिकतेची ताकद खूप प्रभावी ठरल्याचे वेळोवेळी दिसून आले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात समावेशासाठी सुमारे सहा दशके सनदशीर  मार्गाने लढत आहे. अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांना आश्वासनांवर झुलवत ठेवले. त्यांच्यासाठी लढताना एनडी सर त्यांच्यातलेच होऊन गेले. सीमावासीयांना नेहमीच त्यांचा  वडिलधारा आधार वाटत राहिला. 

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इस्लामपूरची महात्मा फुले शिक्षण संस्था, साताऱ्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, बेळगावची दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, कालकुंद्रीचे खेडूत शिक्षण मंडळ, इचलकरंजीची समाजवादी प्रबोधिनी अशा संस्थांचे प्रमुखपद स्वीकारून रचनात्मक कामातही त्यांनी योगदान दिले. 

पुरोगामी विचारांच्या अशा अनेक छोट्या-मोठ्या संस्था, चळवळी आणि कार्यकर्त्यांच्या मागे आधारवडासारखे उभे  राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील  पुरोगामी चळवळ खंबीरपणे उभी होती. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या चळवळी पोरक्या झाल्या आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment