मनोरंजन

आता लवकरच ही मालिका घेणार निरोप

गेल्या काही दिवसांमध्ये मराठी मालिकांच्या बाबतीत काही अपडेट समोर येत आहेत. काही मराठी मालिकांनी ९०० भागांचा टप्पा ओलांडला आहे तर काही मालिकांनी अल्पावधीतच निरोप घेतला आहे. प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे काही सांगता येत नाही याचा प्रत्यय अनेक मालिकांना येत असतो. एकेकाळी गाजलेला फू बाई फू हा शो अवघ्या महिनाभरात बंद करावा लागतो तो प्रेक्षकांना प्रतिसाद न मिळाल्याने. तर सुरूवातीला ही मालिका कोण बघणार अशी चर्चा झालेली बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका आज १३०० भाग पूर्ण करते ते प्रेक्षकांमुळेच.
 
प्रेक्षकांचा टीआरपी मालिकेला चर्चेत ठेवतो तसा मालिकेतील कलाकारांमुळेही मालिका गाजते. अशीच एक मालिका म्हणजे मुलगी झाली हो. मुलगी, आणि तीही मुकी असेल तर तिला कुटुंबात कसं स्थान मिळत नाही, वडिलांच्या प्रेमासाठी ती भुकेली राहते. अशा मुलीच्या आयुष्याची कथा मुलगी झाली हो या मालिकेतून मांडण्यात आली. अभिनेता किरण माने याला या मालिकेतून अचानक काढून टाकल्यामुळे प्रचंड चर्चेत आलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. माऊ म्ह्णजेच साजिरी आणि शौनक यांच्या नात्याचा शेवट काय होणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षकांचे डोळे मालिकेच्या शेवटाकडे लागले आहेत. मुलगी झाली हो ही मालिका लवकरच संपणार असल्याचं अधिकृत जाहीर करण्यात आल्यानंतर या मालिकेच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत दाखवणाऱ्या येणाऱ्या उपकथानकावरही सोशलमीडियावर अनेक कमेंट येत होत्या.
 
या मालिकेत विलास पाटील ही भूमिका अभिनेता किरण माने साकारत होता. सध्या किरण माने बिग बॉस मराठी हा शो गाजवत आहे. किरणने साकारलेली विलास पाटील ही भूमिका खूपच गाजली. मात्र १६ जानेवारीला किरण माने याला या मालिकेतून अचानक काढून टाकण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. किरण हा राजकीय भूमिका घेतो, सोशलमीडियावर राजकीय मतं मांडतो, त्यामुळे त्याचा परिणाम मालिकेवर होतो असं कारण यासाठी निर्मात्यांनी दिलं होतं. इतकच नव्हे तर त्यानंतर प्रतिक्रिया देताना मालिकेतील काही कलाकारांनी किरण सेटवर व्यवस्थित वागत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र किरणने हे सगळे आरोप धुडकावून लावत, आता मला काढून टाकल्यानंतर मालिका कशी चालते ते बघतो असं खुलं आव्हान दिलं होतं.
 
किरणच्या जागी अभिनेता आनंद अलगुंडे हे विलास पाटीलची भूमिका साकारत होते. किरण या मालिकेतून गेल्यानंतर काही दिवसातच मालिका बंद होणार अशी चर्चा सुरू झाली. पण मालिका बंद करण्याऐवजी मालिकेची रात्रीची वेळ बदलून दुपारी दोन वाजता करण्यात आली. खरंतर त्यानंतर मालिकेचा टीआरपी घसरण्यास सुरूवात झाल्याचे रिपोर्ट दिसू लागले. आता ही मालिका निरोप घेणार आहे.
 
मुलगी झाली हो या मालिकेच्या प्रवासात अनेक चढउतार आले. किरण माने यांच्या एक्झिटनंतर अभिनेते अजय पूरकर यानेही या मालिकेला रामराम ठोकला होता. मालिकेतील काही संवाद व दृश्यांवरून ही मालिका सोशलमीडियावर ट्रोलही झाली होती. तर मालिकेतील कलाकारांनी केलेल्या रिल्समुळे मालिका सोशलमीडियावर ट्रेंडिंगमध्येही राहिली. सिध्दांत, साजिरी आणि शौनक यांच्या डान्स व्हिडिओ रिल्समुळेही या मालिकेची चर्चा होती. मोठी चर्चा झाली ती या मालिकेतील किरण माने याची एक्झिट आणि त्यामुळे मालिकेची बदलण्यात आलेली वेळ, घसरलेला टीआरपी याची. आता मुलगी झाली हो या मालिकेचा सुखद शेवट करून मालिका बंद करण्यात येणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment