कोंकण महाराष्ट्र

नितेश राणेंवर माजी आमदार परशुराम उपरकर भडकले

सिंधुदुर्ग – आम.नितेश राणे यांनी मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे, त्यांना आम्ही भरपूर सल्ले दिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न केलात तर काँग्रेसमध्ये असताना जी भूमिका व वक्तव्ये आम.नितेश राणे यांची होती, ती जनतेसमोर आणू, असा इशारा मनसेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मनसेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर पत्रकारांशी बोलत होते. आम.नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, आमदारकीची शपथ घेण्यावेळी ‘समानतेने वागेन’ या वाक्याचा नितेश राणे यांना विसर पडला आहे हे नांदगाव येथे वक्तव्य करताना दिसून आले. १९९० मध्ये त्यांचे वडिल येथे आले त्यावेळी केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी आम्ही विकास केला म्हणून जे सांगितले जाते, तो विकास त्यांनी केलाच नाही, असे आमदार नितेश राणेंना म्हणायचे आहे का? असा सवाल करताना ते म्हणाले,केंद्र व राज्यात १९९० च्या सुमारास काँग्रेसची सत्ता असताना आम्हीच विकास केला म्हणून त्यावेळी आम्हीही सांगायचो व आताही सांगतो. मग त्यावेळी नितेश राणे यांच्या वडिलांनी काहीच केले नाही, असे त्यांना म्हणायचे आहे का? की आता भाजपाने आपले सरपंच येणार नाहीत, तेथे विकास करायचा नाही, असे ठरविले आहे का? भाजप पक्षाची ही भूमिका आहे का ते जाहिर करावे. असा टोला उपरकर यांनी लगावला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार राज्य, देश आणि परदेशात मानणारे आहेत. ते जिल्हा दौऱ्यावर आलेले असताता आपली कशी जवळीक आहे, हे दाखवून देत मनसेच्या कार्यकर्त्यांवर आपण दबाव आणू असे जर आम.नितेश राणे यांना वाटत असेल तर मनसेचे कार्यकर्ते लेचेपेचे नाहीत. हे लक्षात ठेवा. तुम्ही भेटून गेल्यानंतर राज ठाकरे यांनी आम्हालाही काय बोलायचे याचा कानमंत्र दिलेला असल्याचेही उपरकर म्हणाले. जिल्ह्याच्या विकासाबाबत काय बोलयचे याचे अधिकार आमच्याकडे आहेत तेव्हा काय बोलायचे ते आम्हीच ठरवितो. त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. तुमच्या सांगण्याने निर्णय होत नाही. पण तुमची आज जी भूमिका आहे, ती जुन्या भाजपाला मान्य आहे का? आपण स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना आपण दिलेल्या धमकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र, यापुढे विधानसभा निवडणूकाही येणार आहेत. त्यावेळीही मला मतदान केले नाही तर विकास नाही, असे आपण सांगणार का? मतदार हा मतदान करण्यासाठी मोकळा असतो. त्यामुळे मला अशा प्रकारचे सल्ले देण्याचा प्रयत्न करू नका. तसेच पुन्हा आमच्यावर बोललात तर काँग्रेसमध्ये असतानाची भूमिका पुढे आणून आज भाजपला हे चालते का? हे ही विचारावे लागेल, असेही परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment