कोंकण महाराष्ट्र राजकारण

#Niteshrane असे रंगले सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे राजकीय नाट्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली हवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या फायद्याची ठरेल, असा अनेकांचा दृष्टीकोन होता. किंबहुना आघाडीतील सर्वानाच या लाटेवर आपण निवडून येऊ असे वाटले होते. त्यात जिल्हा बँकेत गेली ३० ते ३५ वर्ष संचालक म्हणून असलेल्या लोकांना आपण पडणार नाही असा प्रचंड आत्मविश्वास होता. तेच संचालक पडले, आघाडीतील दिग्गजांना आज घरी बसावे लागले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात फारसा समन्वय दिसून आला नाही. त्यात शिवसेनेतील शह-काटशहाचे राजकारण सतीश सावंत याना महागात पडले.

विवेक ताम्हणकर, कोंकण

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना फारशी कमाल करता आली नाही. भाजपाने सत्ता हस्तगत केली. ही निवडणूक शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ला आणि या प्रकरणात आमदार नितेश राणे यांचे नाव आल्याने संपूर्ण राज्यभर चर्चेत आली.

बँकेवरील वर्चस्वासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे तर जिल्ह्यात ठाण मांडून होतेच, शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जिल्ह्याचा दौरा केला. कणकवली खुनी हल्ल्याचे राजकारण इतके पेटले की, राज्याचे पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची फौज जिल्ह्यात उतरली.

आमदार नितेश राणे यांना या निवडणुकीच्या एकंदर सर्वच गोष्टींपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा शिवसेना यशस्वी झाली मात्र, त्यांच्या मागे नारायण राणे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतली. महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना राणेंना अडकविण्यात आणि राणेंविरोधी आवाज बुलंद करण्यात गुंतलेली असताना निवडणुकी दरम्यान वरवर शांत असलेले राणे पडद्यामागे सारे काही पॅक करण्यात यशस्वी झाले. खरंतर ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी झाली. त्यात महाविकास आघाडीचा पराभव झाला.

नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ
कोकणात निवडणुका म्हटल्या कि, राजकीय राडे आलेच. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकही अशाच गोष्टींनी गाजली. कणकवलीतील शिवसैनिक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर शनिवार १८ डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला.

या प्रकरणी सुरवातीलाच आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावर आरोप करण्यात आला. पुढे पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातील संशयितांना अटक केली. या प्रकरणी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर सचिन सातपुते या नितेश राणे यांच्या निकटवर्तीयाला दिल्लीतून अटक करण्यात आली.
यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी होऊ लागली,

पोलीस ठाण्यावर मोर्चाही निघाला. लागलीच नितेश राणे गायब झाले, त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना नितेश राणे मात्र अद्यापही गायबच आहेत.

सहकारातील नितेश राणे यांचा प्रवेश थांबला
दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेची निवडणूक झाली. हाती आलेल्या निकालानुसार बँकेत सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली आहे. १९ पैकी भाजपाने ११ जागा जिंकल्या आहेत. सुरवातीला आमदार नितेश राणे यांनी उभ्या केलेल्या आव्हानाला सतीश सावंत हे महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख म्हणून एकहाती तोंड देत होते.

बँक निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सावंत यांनी पहिला आघात आमदार नितेश राणेंवरच केला. त्यांच्या ताफ्यातील इनोव्हा कार जिल्हा बँकेचे लोन थकीत असल्याने जप्तीची नोटीस बँकेने काढली. ही कार नंतर नितेश राणे यांच्या स्वीय सहाय्यकाने जिल्हा बँकेच्या दारात आणून लावली.

डिसेंबर २०२० मधल्या या घटनेनंतर प्रत्यक्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तारीख जवळ आली आणि जिल्हा बँकेचे १६ कोटी रुपयांचे थकबाकीदार असल्याने राणे यांना सहकार विभागाने मतदानाचा हक्क नाकारला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून होणारी चर्चाही थांबली. सहकारातील नितेश राणे यांचा प्रवेश यामुळे थांबला.

नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हाती सूत्रे
निवडणुकीची धामधूम सुरू झाली. नितेश राणे एकहाती भाजपाची कामे सांभाळत होते. परंतु संतोष परब यांच्यावरील खुनी हल्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि त्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून थेट अज्ञातवास गाठला. तात्काळ केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्ह्यात दाखल झाले. आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे फिल्डवरची जबाबदारी सोपविण्यात आली.

इकडे शिवसेनेने रान पेटविले होते. त्यात नारायण राणे यांच्या नितेश राणे यांच्या बद्दलच्या वक्तव्यावरून पोलिसांनी त्यांना चौकशीला हजर रहायची नोटीस दिली. राणे हजर राहिले नाहीत मात्र त्यांच्या स्वभावानुसार ते अजिबात वागले नाहीत. पोलिसांना आपण कामात असल्याने हजर राहू शकत नसल्याचे पत्र देत निवडणुकीच्या रणांगणात त्यांनी लक्ष केंद्रित केला.

विरोधक तुटून पडलेले असताना आणि मुलावर अटकेची टांगती तलवार असताना शांत बसणे आणि ते राणेंनी शक्यच नव्हते. पोलीस यंत्रणाही त्यामुळे तणावाखाली होती. मात्र राणेंची शांतता सर्वानाच अस्वस्थ करत होती. शांततेचा फायदा झाला, भाजपा जिल्हा बँकेत सत्तारूढ झाली.

अंतर्गत गटबाजी आणि गाफील महाविकास आघाडी
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांनी निवडणुकी संदर्भातील साऱ्या काही गोष्टी स्व केंद्रित केल्या होत्या. जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यात महाविकास आघाडीचे पॅनल आणि नेते कमी पडले.

सर्वच आघाड्यांवर केवळ सतीश सावंत दिसत होते. राणेंविरोधात आवाज पेटविताना सतीश सावंत यांच्या सोबत त्यांच्याच पक्षातील अन्य नेत्यांचा तेवढा म्हणावा तसा सहभाग दिसला नाही. तर आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाच्या नेत्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत होती. तर राणेंच्या विरोधात जिल्ह्यात झालेली हवा महाविकास आघाडीच्या फायद्याची ठरेल, असा अनेकांचा दृष्टीकोन होता. किंबहुना आघाडीतील सर्वानाच या लाटेवर आपण निवडून येऊ असे वाटले होते.

त्यात जिल्हा बँकेत गेली ३० ते ३५ वर्ष संचालक म्हणून असलेल्या लोकांना आपण पडणार नाही असा प्रचंड आत्मविश्वास होता. तेच संचालक पडले, आघाडीतील दिग्गजांना आज घरी बसावे लागले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात फारसा समन्वय दिसून आला नाही. त्यात शिवसेनेतील शह-काटशहाचे राजकारण सतीश सावंत याना महागात पडले.

सावंत हे देवगड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेकडून दावेदार आहेत. त्यात मराठा समाजातील शिवसेना नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार नितेश राणे याना मात देण्यात देवगड मतदारसंघात सावंत यशस्वी झाले तर निश्चितच शिवसेनेतील त्यांचे महत्व आणखीन अधोरेखित होईल.

हीच बाब स्थानिक पातळीवरील काही नेत्यांच्या पचनी पडणारी नाही. विशेष म्हणजे त्यांना या निवडणुकीत नशिबानेही दगा दिला. समसमान मते झाल्यामुळे चिठ्ठी टाकून उमेदवार निवडण्यात आला त्यात सावंत पराभूत झाले. सावंत यांच्या जिल्हा बँकेच्या मतदार संघात एकूण ३७ मते होती. यातील प्रमोद वायंगणकर हे अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांची २ मते वगळली तर ३५ मतदान झाले पाहिजे होते, मात्र ३४ मतदान झाले आणि १ मतपत्रिका कोरी निघाली. इथेच झालेला घोळ निर्णायक ठरला. महाविकास आघाडीत पुन्हा समन्वय नसणे आणि नेत्यांमधील गटबाजी त्रासाची झाली. काही नेत्यांचीच निर्णायक मते भाजपाच्या गळाला लागली.

राणेंचे शह-काटशहाचे राजकारण आणि भाजपा
या निवडणुकीत धनशक्तीचा मोठा प्रभाव दिसून आल्याचे जाणकार सांगतात. प्रदेश भाजपाकडून यासाठी मोठी रसद पुरविली गेली. स्वतः देवेंद्र फडणवीस या निवडणुकीवर लक्ष ठेऊन होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि बँक निवडणूक पॅनल प्रमुख राजन तेली यांच्या पराजयामागे राणेंचा अप्रत्यक्ष हात असल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात.

तेली हे राणेंना सोडून राणेंच्या अगोदर भाजपात आलेले आहेत. दुसरं तेली म्हणजे प्रदेश भाजपाने सिंधुदुर्गात राणेंना पर्यायी व्यवस्था म्हणून उभं केलेलं माध्यम आहे. तेली वाढणे हे राणेंच्या एकाधिकार शाहीला अडथळ्याचे ठरू शकते. शिवाय तेली राणेंना सोडून गेल्याच राग राणेंच्या मनात नसावा असे म्हणता येणार नाही.

प्रदेश भाजपात तेली यांचे असलेले वजन पाहता सिंधुदुर्गात त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक वर्ग तयार झालेला आहे. शिवाय तेली हे सावंतवाडी मतदार संघात भाजपाकडून आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. राणेंच्या एकाधिकारशाहीला हे पक्षांतर्गत आव्हान आहे. दुसरं प्रदेश भाजपणेही या निवडणुकीत एका दगडात दोन पक्षी मारले. नितेश राणे यांना खुनी हल्ला प्रकरणी जमीन मिळविण्याच्या भानगडीत अडकून पडावे लागल्याने राणेंच्या हातून जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेची सूत्रे जवळपास निसटली होती.

नंतर नारायण राणे जिल्ह्यात दाखल झाले असले तरी ते एका जाग्यावर बसून सूत्रे हलविण्या पलीकडे काही करू शकत नव्हते. यावेळी फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील आमदार रविंद्र चव्हाण यांना सिंधुदुर्गात पाठविले. पडद्यामागे आमदार चव्हाण यांनी बरीच सूत्रे हलविली. कधी नव्हे ते मतदारांना या निवडणुकीत अनपेक्षित लक्ष्मी दर्शन झाले. एका बाजूला प्रदेश भाजपाने आमदार नितेश राणे प्रकरणी राणेंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. तर दुसऱ्या बाजूला रसद पुरवून आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंइतकेच प्रदेश भाजपचे महत्व अधोरेखित केले.

राणेंवरील प्रहाराची खेळी बूमरँग झाली
जिल्हा बँक निवडणुकीत महा विकास आघाडीचे नेतृत्व शिवसेनेने केले. पॅनल प्रमुख सतीश सावंत हे शिवसेनेचे नेते आहेत. पूर्वी ते राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. राणेंच्या सर्वच संस्थांमध्ये सतीश सावंत यांच्यावर प्रमुख जबाबदारी होती. मग ती राणेंचे मेडिकल कॉलेज असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेज. राणेंच्या जवळ असलेल्या सतीश सावंत यांनी राणेंविरोधात बड करत शिवसेनेत प्रवेश केला. मागच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांच्या विरोधात देवगड मतदार संघात त्यांनी निवडणूक लढवली.

राणेंच्या मुशीत तयार झालेल्या सतीश सावंत यांनी राणे यांच्याच स्टाईलने त्यांना या निवडणुकीत मात देण्याचा प्रयत्न केला. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात संतोष परब खुनी हल्ल्याप्रकरणी हवा तापवण्यात सावंत यशस्वी झाले. नितेश राणे यांना त्यांनी मैदानातून बाहेर काढले खरे मात्र हीच त्यांची खेळी अंगाशी आली. नितेश राणे मैदानात असते तर नारायण राणे आणि प्रदेश भाजपा या निवडणुकीमध्ये फारसे लक्ष देत नाही. परंतु प्रदेश भाजपाचा प्रवेश आणि प्रदेश पातळीवरून पुरवली गेलेली रसद महाविकास आघाडीच्या पॅनलला मात देणारी ठरली.

दरम्यान जिल्हा बँकेत मतदारांनी कौल कुणाच्या बाजूने दिला हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही. कारण सहकार आतल्या मतांचे राजकारण अलिकडच्या काळात लक्ष्मी दर्शनानेच बदलले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा बँकेत असलेल्या ठेवी या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आहेत.

पॅनल कोणतही निवडून येऊ देत त्या पॅनलने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला नाही तर ठेवीदार मतदारांच्या कौलाचा विचार न करता आपल्या ठेवी माघारी घ्यायला सुरुवात करतील. यातून सर्वसामान्यांचे घामाचे पैसे बुडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शह-काटशहाच्या राजकारणात आणि वर्चस्वाच्या लढाईत येथील राजकीय नेते गुंतले असले तरी त्यांना सामान्यांच्या गुंतवणुकीचा विचार सर्वात आधी करावा लागेल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment