विचार

दि.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त……!

रायगड ; रविंद्र कान्हेकर

मतदार नोंदणी अन् मतदान ….

एक सामाजिक कर्तव्य ..!
….मतदार बंधू-भगिनींनो…

 हे वाक्य कानावर आले की निवडणुकीची चाहूल लागते. निवडणूका जवळ आल्या म्हणजे प्रचार, पदयात्रा, कार्यकर्ते, उमेदवारांची भाषणे, मतदारयाद्या,आचारसंहिता, शासकीय यंत्रणेची लगबग इत्यादी आलेच.

 भारतीय संविधानानुसार निवडणूक लढणे, निवडणुकीत मतदान करणे तसेच " मतदार नोंदणी" करणे, हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. 

आपल्या देशातील लोकशाहीत ” मतदान पध्दत ” हे संपूर्ण जगाला भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना दि.25 जानेवारी 1950 रोजी झाली असून हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून लोकांमध्ये/युवकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने साजरा केला जातो.

  मतदानाविषयी जनजागृती आणि नवीन मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात लोकशाही पध्दतीने मतदान "लोकशाहीचे प्रतिक" मानले जाते.
 स्वातंत्र्य काळापासून काही वर्ष बँलेट पेपरवर गुप्त मतदान पध्दतीने मतदान होत असे, मात्र काही वर्षांपासून ईलेक्ट्रानिक ईव्हीएम मशिनद्वारे मतदानाचा हक्क व मतमोजणी केली जाते. 

 आपल्या लोकशाहीत मतदान करणे सुद्धा देशसेवा आणि सामाजिक कर्तव्य याचा एक भाग मानला जातो. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे, म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासाठी प्रत्येक भारतीय नवीन सुजाण नागरिकांनी पुढे येऊन आपले नाव मतदार यादीत समावेश करून घेणे महत्त्वाचे ठरते.

 भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी "मतदान नोंदणी व मतदान करणे" का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, प्रभात फेरी, पथनाट्य, निबंध स्पर्धा, शाहिरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबवून जनजागृती केली जाते .

 विशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे, या अनुषंगाने मतदान जागृतीबाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जातो. जेणेकरुन युवा पिढीला मतदानाचे महत्त्व कळेल, व मतदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण होईल.

 "निवडणूक आयोग" भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि महामहिम राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. 

  भारत सरकार दर पाच वर्षांनी मतदारांच्या नोंदणीची विशेष मोहीम राबविते. ही मोहीम मतदार यादी अद्ययावत करण्यासाठीही आखली जाते. या व्यतिरिक्त, भारतातील कोणताही नागरीक निवडणूक आयोगाने तयार केलेले प्रपत्र ६ भरुन, त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करु शकतो. तो अर्ज वैध असला व त्यासोबत आवश्यक ते दस्तावेज जोडले तर, त्याचे नाव त्या विशिष्ट मतदार यादीत समाविष्ट केले जाते. आजच्या ऑनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मतदान नोंदणी केली जाते.

  "मतदान" तसेच " मतदान नोंदणी" हा आपला महत्त्वाचा हक्क व अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात तसेच राज्यात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येक नागरिकांसाठी मतदार नोंदणी व मतदान करणे महत्त्वाची बाब आहे. माझ्या एका मताने काही फरक पडणार नाही असा समज काढून टाका कारण चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. यासाठी आपली मतदार नोंदणी महत्त्वाची आहे.

 भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. मुख्यालयाचे प्रमुख म्हणजेच आयोगाचे मुख्य आयुक्त असतात. राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात तसेच सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली जाते. भारतातील सर्वोच्च संस्था म्हणून निवडणूक आयोगाची गणना केली जाते.

ऑनलाइन मतदार नोंदणी’.:-
निवडणूक आयोगाने इच्छूकांना ऑनलाइन अर्ज करता यावा, यासाठी वेबसाइटही सुरू केली आहे. या वेबसाइटवर भेट दिल्यास संपूर्ण प्रक्रिया समजू शकते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in ला भेट द्यावी. व नंतर ‘अप्लाइ ऑनलाइन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर’वर क्लिक करा. आपण, आपले शेजारी, मित्रपरिवार, आप्तेष्ट इ. मतदान नोंदणी करु शकता.
चला तर मग…आजच आपली मतदार नोंदणी करु या..!आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडू..!

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment