बारामती – राज्यात महापुरुषांबद्दल वाचाळ वीर काहीही बोलत आहेत. बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे, या शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार, खासदारांवर निशाणा साधला. गुणवडी (ता. बारामती) येथे आयोजित विविध विकासकामांच्या उदघाटनानंतर ते सभेत बोलत होते. पवार म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अवमानजनक बोलले जात आहे. कर्मवीरांनी भीक मागून शाळा बांधल्या ही कोणती बोलण्याची पद्धत. यांना सत्तेची मस्ती आली आहे. माणूस एकदा चुकला तर समजू शकतो. परंतु सतत चुकीचे बोलले जात आहे. राज्यपाल चुकले की एक मंत्री चुकतोय, लगेच दुसरा मंत्री चुकतोय, ते झाले की आमदार चुकतोय, खासदार चुकतोय, असे कसे चुकून चालेल, असेही पवार म्हणाले.
आपल्याकडे महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आपल्याकडील कोट्यावधींची गुंतवणूक होवू पाहणाऱ्या कंपन्या, कारखाने दुसऱया राज्यात चाललेत त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, कोणी उत्तर द्यायला तयार नाही., त्यासंबंधी विचारले तर बघू, करू अशी उत्तरे दिली जातात. हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कदापी झालेले नव्हते. आत्ता मात्र सत्तेला आसूसलेली ही माणसं कुठल्याही थराला जायला मागे पुढे पाहत नाहीत. लोकांना खोके हा प्रकार माहित नव्हता. परंतु आता खोके… ओके लोकं म्हणायला लागली आहेत. या ज्या काही गोष्टी आहेत, त्या महाराष्ट्राला नाही तर देशाच्या लोकशाहीला घातक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेय त्यालाही बाधा आणणारे आहे. काहीजण तर संविधान अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका पवार यांनी केली.
मंत्रीमंडळात एकही मंत्री नाही..
३६ जिल्ह्यासाठी फक्त २० मंत्री आहेत. काही-काही मंत्र्यांकडे पाच ते सहा जिल्ह्यांचा कारभार आहे. ते कधी वेळ देणार, काय करणार. एकाही महिलेला मंत्री केले नाही. महिलांचा अधिकार, हक्क नाही का. तुम्ही महिलांची मते घेता पण त्यांना मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेत नाही. हे सरकारचे अपयश आहे. मी या विषयावर अनेकदा बोललो. पण राज्यकर्ते फक्त बघू, करू अशी आश्वासने देत आहेत. तुमची दोन वर्षे राहिली आहेत, त्यात शेवटचे सहा महिने निवडणूकीत जातील, दीड वर्षे राहिली मग कधी संधी देणार असा सवाल पवार यांनी केला.