कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर भुषण, सिनेट सदस्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीमध्ये कोल्हापूरचे वैभव वाढवणारे, विक्रमी १४ पुरस्कार विजेते कोल्हापूरचे सुपुत्र चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या ४ थ्या स्मृती दिनानिमित्त यसबा करंडक आंतरशालेय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना कलेची आवड वाढावी व कला सादरीकरण यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळावे, या हेतूने १८ डिसेंबर सकाळी ९ वाजता वि. स. खांडेकर भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ येथे हा यसबा करंडक रंगणार आहे. जवळपास १५ शाळांचे विद्यार्थी कलाकार यात सहभागी होणार आहेत.
चित्रकला – निबंध – एकपात्री – समूह गायन – समूह नृत्य अशा पाच कलाप्रकारामध्ये ही स्पर्धा होणार असून यसबा करंडक हा फिरता करंडक असणार आहे.या महोत्सवाची संकल्पना संग्राम यशवंत भालकर यांची असून हे महोत्सवाचे पहिले वर्ष आहे आणि त्यास खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. प्रकाश गायकवाड, आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. फौंडेशनचे अध्यक्ष संदीप भालकर यांनी यातील निवड कलाकारांना कला क्षेत्रातील विविध संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
फौंडेशनच्या उपाध्यक्ष सपना जाधव यांनी हा उपक्रम दरवर्षी घेण्यात येईल ,असे प्रतिपादन केले.यावेळी यसबा करंडक समिती सदस्य भुषण पाठक, आशिष हेरवाडकर, आकाश लिगाडे, अभय पाटील, उमेश चौगुले, एस चकापुरे, सताक्षी जोशी, सपना चव्हाण, राजनंदिनी पत्की, अदि कलाकार समिती सदस्य या चळवळीस साथ देण्याचे आवाहन केले आहे.