पश्चिम महाराष्ट्र

पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

कोल्हापूर – सध्या ऊस तोडणी हंगामाची सुरवात झाली असून साखर कारखानदाराकडून उसाची पळवापळवी चालू झाली आहे. तोडणी मजुरांनी तोडलेल्या ऊस लवकरात लवकर कारखान्यात पोहचावा यासाठी शेतकऱ्याची धडपड चालू असते. परंतू गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांच्या शेत शिवारातील पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने ऊस वाहतूकीची कोंडी निर्माण झाली आहे.

त्यामूळे मनुष्यबळाचा वापर करून ऊसाची वाहतूक करावी लागत आहे.परिणामी आतिक्रमण झालेले पाणंद रस्ते खुले करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गावगाड्यापासून शेताशिवारात जाण्यासाठी किंवा वाहतूकीसाठी पाणंद रस्ते महत्वाचा दुवा आहेत. महसूल खात्याकडे पाणंद रस्त्याची रुंदी पंधरा फुटापासुन आहे परंतू या पाणंद रस्त्यालगच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने अनेक गावात पाणंद रस्त्याचे आस्तित्वच शिल्लक राहिले नसल्याचे पहावयास मिळत आहे.

परिणामी, या रस्त्यांच्या अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका ऊस तोडणी हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, रस्त्याअभावी ऊसाची वाहतूक ट्रॅक्टर व बैलगाडी ऐवजी मनुष्यबळाचा वापर करून करावी लागत आहे. शेतमजुरांना ऊस वाहतूकीसाठी डोक्यावरून ऊसाची वाहतूक मुख्य रस्त्यापर्यंत करावी लागत आहे. एकमेकांच्या शेतामध्ये काम करण्याची परंपरागत पध्दत, बंद झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे परिणामी मजुरांना एका दिवसासाठी दोनशे ते तिनशे रुपये हजेरी मोजावी लागत आहे. अगोदरच शेतीसाठी शेतकऱ्यांना पावलोपावली पैसे मोजावे लागत असून त्यातही ऊसाची तोढणी करावी लागल्यास खर्चात मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे. पाणंद रस्त्याचे अतिक्रमण रस्त्यालगतचे शेतकरी करतातच आणि त्याचा त्रास इतर शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष सहन करावा लागतो. 

गगनबावडा तालुका कमी लोकसंख्येचा तालुका आहे त्यामुळे प्रत्येक गावात गावकी- भावकीचे राजकारण चालते त्यामुळे मुद्दाम एकमेकांच्या शेतात जाणारे रस्ते अडवणे ऊस वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर पाणी सोडणे, रस्ता न देणे, शेतात जाण्यास वाट न ठेवणे अशा प्रकारचे प्रकार घडतात अशा लोकांच्यावर शासकीय यंत्रणेने कडक कारवाई करणे गरजेचे आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment