खान्देश

पिकअप गाडीचा भीषण अपघात

नवापूर – तालुक्यातील खोकसा घाटात मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा ब्रेक न लागल्याने अपघात झाला. अनियंत्रित वाहन घाटात ३०-४० फूट खाली उलटल्याने भीषण अपघात झाला. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर १० मजूर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रात्री बारा वाजेच्या सुमारास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. ३० डिसेंबर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील खोकसा घाटातील रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

या अपघातात सुमित्रा मोहन गावित वय ४५ तर दुसरी महिला अनिताबाई दिलीप गावित वय ३० राहणार नवागाव खांडेपाडा ता. नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त जखमी मजुरांवर उपचार सुरू असल्याचे दिसून आले.

नंदुरबार तालुक्यातील नवागाव (खांडेपाडा), नवापूर तालुक्यातील बिजादेवी येथील बांधकाम व्यवसायिक मजूर हे साक्री तालुक्यातील उमरपाटा परिसरात घर बांधकामाचे स्लॅब भरून मजुरांसह पिकअप वाहन व मागील बाजूस स्लॅप भरण्याचे मशीन व लोट गाडी जोडून खोकसा घाटातून येत असताना अचानक हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या अपघातात खांडेपाडा तालुका नंदुरबार येथील १६ मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात एवढा भीषण होता की यात पिकअप वाहन पलटी झाल्यावर वाहनात बसलेले जवळपास १६ व्यक्ती व २ महिला मजूर पिकअप वाहनाखाली दाबले गेले. यात पिकअप वाहन व स्लॅप बांधकाम मशीन चक्काचूर झाले होते.

घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने वाहनाखाली दाबले गेलेले मजुरांना बाहेर काढून तीन ते चार १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment